रत्नागिरी, 14 डिसेंबर, (हिं. स.) : जिंदल कंपनीचा मनमानी कारभार सुरू आहे. ७० मुलांना वायू गळतीचा त्रास झाला, तरी माणुसकी या नात्याने कंपनीने साधी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली नाही. एक अधिकारी रुग्णालयात आला नाही. एवढी कंपनीची मुजोरी सुरू आहे. वायुगळती ही धोक्याची घंटा आहे. कंपनीमुळे अनेकजण बेघर झाले आहेत. कंपनीच्या या बेबंदशाहीविरोधात प्रशासनाने काही केले नाही तर, ठाकरे शिवसेना जनआंदोलन छेडेल, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा समन्वयक संजय पुनसकर यांनी दिला. या आंदोलनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. माजी खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी शहर संघटक प्रसाद सावंत, विभागप्रमुख साजीद पावसकर उपस्थित होते. पुनसकर म्हणाले, जिंदल कंपनीमध्ये जी वायुगळती झाली त्याची वाहतुकीची प्रक्रिया योग्य नव्हती, हेच गळतीचे मूळ कारण आहे. जेव्हा जिंदल कंपनी १९९२ ला आली तेव्हा खरेदीखत केले, तेव्हा स्टील प्रकल्प होता. २००६ मध्ये यामध्ये बदल झाला आणि ऊर्जा प्रकल्प झाला. तेथे स्थानिकांना फिरकूदेखील दिले जात नाही. काय चालले आहे हे कळत नाही. सामाजिक बांधिलकी म्हणून कंपनीची काही जबाबदारी होती. तातडीची उपाययोजना आवश्यक होती. पंचक्रोशीमध्ये लोक आता या गळतीमुळे भीतीच्या छायेत आहेत. कंपनीचे अधिकारी हात वर करत असतील तर जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेण्याची गरज आहे. त्यांनी नाही घेतली तर जिंदाल कंपनीच्या विरोधात जनआंदोलन छेडले जाईल, असे पुनसकर यांनी सांगितले. सीएसआरच्या माध्यमातून किती मदत केली हे कधीच सांगितले गेले नाही. या बाधित ७० मुलांच्या आरोग्याची जबाबदारी आता कंपनीने घेतली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. जिंदल पोर्टवर बोटीद्वारे हा गॅस येतो आणि तेथून गेल कंपनीला सुमारे ९० किमीवर पुरविण्यासाठी जोडला जातो; परंतु आता त्या प्रक्रियेमध्ये बदल झाला आहे. गॅस आता स्टोअर केला जातो; परंतु या सर्व प्रकारची जबाबदारी आरटीओ आणि कंपनीची आहे. आता गॅस गळतीची जबाबदारी कोणाची..? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / बाळकृष्ण कोनकर