डोंबिवली, 22 डिसेंबर (हिं.स.)।
कल्याण पूर्व मध्ये रेबीजमुळे पहिलाच मानवी मृत्यू गेल्या 20 वर्षांत झाल्यामुळे डोंबिवली येथील पॉज संस्था आणि लंडनमधील वर्ल्ड वाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस तर्फे भटक्या श्वानाना मोफत अँटीरेबीज लसीकरण करण्यात आले. सुमारे 140 भटक्या जनावरांना ही अँटी रेबीज ची लस देण्यात आली. डोंबिवली, ठाकुर्ली, कल्याण, उल्हासनगर, आणि अंबरनाथ शहरात सदर मोहिम राबवण्यात आली असे पॉज संस्थेचे संस्थापक डॉ. निलेश भणगे यांनी सांगितले.
शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून, त्यांना रेबीजची लागण होण्याची शक्यता आहे. याचा मानवी आरोग्यालाही धोका संभवतो. पॉज'तर्फे दर वर्षी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रेबीज लसीकरण मोहीम घेतली जाते. ठाणे शहरासह उपनगरात भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे. रेबीज झालेला कुत्रा माणसाला चावल्यास त्याचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे शहरी कुत्र्यांना अँटी रेबीज लस देण्याचा उपक्रम पॉजने मागील एकवीस वर्षांपासून सुरू केला. विविध पालिकांकडून कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले जाते. त्याचवेळी त्यांचे लसीकरण करण्यात येते. मात्र, भटक्या कुत्र्यांचे लसीकरणच होत नसल्याने त्यांच्यासह परिसरातील सर्वसामान्यांच्या जीवालाही धोका निर्माण होतो. त्यामुळेच ही विशेष रेबीजविरोधी मोहीम हाती घेण्यात आली.
नुकतीच रेबीजमुळे एक मानवी मृत्यू झाल्याची घटना झाली. त्यामुळे जागतिक संघटनानी याची दखल घेऊन मोठ्या प्रमाणात रेबीज प्रतिबंधक लस ही भटक्या श्वानाना देण्यात येईल असे जाहीर केले. त्याप्रमाणे रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांसह इतर प्राण्यांना रेबीजसारख्या आजारांची लागण होते. यासाठी प्लॅन्ट ऍन्ड ऍनिमल वेल्फेअर सोसायटी (पॉज)ने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. पॉज संस्थेचे ओंकार साळुंखे आणि लंडनच्या वर्ल्ड वाईड व्हेटरनरी सर्व्हिसचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विन आणि राज गुप्ता यांच्या साथीने विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली.
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi