रत्नागिरी, 22 डिसेंबर, (हिं. स.) : कोकण विभागातील विद्यार्थ्यांमध्ये एक नवी ऊर्जा आणि सर्जनशीलता पाहायला मिळते. त्यामुळे कोकणातील विद्यार्थ्यांचे सर्वच क्षेत्रातील योगदान मोलाचे आहे. अशा या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संस्कारक्षम शिक्षण देतानाच त्यांना सर्वच क्षेत्रात परिपूर्ण करण्यासाठी मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या सर्वच शाळा व महाविद्यालयातून सुरू असलेले प्रयत्न समाजासाठी आदर्शवत आहेत, असे प्रतिपादन रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी केले.
मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर विद्यालय व भाई मयेकर ज्युनिअर कॉलेजच्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. मुख्याध्यापक बिपीन परकर यांनी शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रास्ताविक संस्थेचे सचिव विनायक राऊत यांनी केले. अध्यक्ष सुनील मयेकर यांनी विविध अडचणीवर मात करत शिक्षणाचा प्रवाह कायम ठेवल्याचे सांगितले. कार्यक्रमाला उपाध्यक्ष विवेक परकर, खजिनदार संदीप कदम, संचालक गजानन पाटील, किशोर पाटील, रोहित मयेकर, निमंत्रित संचालक विलास राणे, मुख्याध्यापक बिपीन परकर उपस्थित होते.
मालगुंड एज्युकेशन सोसायटीचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार अ. के. देसाई विद्यालयातील शिक्षक संतोष गार्डी, आदर्श मुख्याध्यापक (कै.) डॉ. दिलीप मुरारी तथा नानासाहेब मयेकर माध्यमिक विद्यालय (काजुर्ली) शाळेचे मुख्याध्यापक आशीष घाग, संस्थेच्या अनौपचारिक शिक्षण समितीमार्फत दिला जाणारा आदर्श शेतकरी पुरस्कार पिरंदवणे येथील श्रीकांत मांडवकर यांना प्रदान केला. आदर्श विद्यार्थी पुरस्कार तन्मय घाणेकर, रत्नागिरी जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आदर्श प्राथमिक शाळा वाटद-कवठेवाडी शाळेचे माधव अंकलगे यांना सन्मानित करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / बाळकृष्ण कोनकर