सुमारे 1200 पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी हलवले
पॅरिस, 24 डिसेंबर (हिं.स.) : नाताळ सणाच्या पूर्वसंध्येला फ्रान्सची राजधानी पॅरिस येथील जगप्रसिद्ध आयफेल टॉवरला आग लागल्याची घटना घडली. यानंतर त्या परिसरातील सुमारे 1200 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेय. शॉट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती असून या अपघातानंतर आयफेल टॉवर तात्पुरते बंद करण्यात आले आहे.
नाताळाची सुटी असल्यामुळे आयफेल टॉवर परिसरात लोकांची मोठी गर्दी उसळली आहे. अशातच मंगळावीर आयफेल टॉवरच्या लिफ्टमध्ये विद्युत केबल्सला आग लागली. अग्निशमन दलाला ही आग विझवण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. सुदैवाने या अपघातात कुणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. काही तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. दरम्यान सुरक्षिततेच्या कारणास्तव टॉवर तात्पुरता बंद करण्यात आला होता.
आयफेल टॉवरच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याने हे मजले रिकामे करण्यात आले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे 1,200 पर्यटकांना स्मारकातून सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपत्कालीन सेवा तातडीने तैनात करण्यात आल्या आहेत. अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. आयफेल टॉवर हे पॅरिसमधील सर्वात प्रतिष्ठित ठिकाणांपैकी एक आहे. जगातील पर्यटकांसाठी सर्वात लोकप्रिय असे पर्यटन स्थळांपैकी एक आहे. या ठिकाणाला दररोज सुमारे 25 हजार पर्यटक भेट देतात.
--------------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी