नाशिक, 26 डिसेंबर (हिं.स.)।
फारकत पाहिजे असेल, तर ५३ लाख रुपयांची मागणी करीत पैसे दिले नाहीत, तर तरुणाविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देणाऱ्या सहा उत्तराखंड व उत्तर प्रदेश येथील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी मनीष राकेशकुमार गर्ग (३६, रा. मुजफ्फरनगर, उत्तर प्रदेश) स्कूल ऑफ आर्टिलरी, देवळाली कॅम्प येथे नोकरी करतात. गर्ग यांना आरोपी सुरेंद्रकुमार जयस्वाल, तनुषा जयस्वाल, सिद्धांत जयस्वाल, बालेश गुप्ता, सचिन पारासर (सर्व रा. डेहराडून, उत्तराखंड) व सिरील (रा. मुजफ्फरनगर, उत्तर प्रदेश) यांनी संगनमत करून फोन केला. तुम्हाला फारकत पाहिजे असेल, तर ५३ लाख रुपये द्यावे लागतील, तसेच पैसे दिले नाहीत, तर तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल करून तुमची नोकरी घालवू, अशी धमकी देऊन खंडणीच्या स्वरूपात पैशांची मागणी केली. हा प्रकार १२ मे ते १६ ऑगस्ट २०२४ दरम्यान मुजफ्फरनगर, देवळाली कॅम्प येथे फोनद्वारे घडला.
या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात सहा आरोपींविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कोळी करीत आहेत.
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI