सोलापूर, 26 डिसेंबर (हिं.स.)। सोन्याच्या हव्यासापोटी सालगड्याने आपल्याच शेत मालकाचा निर्घृण खून केल्याचा प्रकार मोहोळ तालुक्यातील यल्लमवाडी येथे घडला. धक्कादायक बाब म्हणजे संशयित मारेकर्याने मृत शेतकऱ्याच्या शरीराचे तुकडे करून शौचालयाच्या शोष खड्ड्यात पुरून ठेवल्याचे पोलीस तपासातून उघडकीस आले आहे. हा खून एकट्याने सालगड्याने केल्याची प्राथमिक माहिती असली तरी त्याच्यासोबत अन्य साथीदार आहेत किंवा कसे, याबाबत मोहोळ पोलीस अधिक तपास करीत आहेत. कृष्णा नारायण चामे (वय ५२) असे खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी संशयित आरोपी शेतमजुराला अटक केली आहे. मृत कृष्णा चामे हे बेपत्ता झाल्याबाबत त्यांच्या घरच्या मंडळींनी मोहोळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. पोलिसांच्या तपासात कृष्णा चामे यांच्या ठाव ठिकाणाबाबत कोणतीही माहिती मिळत नव्हती. तपासात मृत चामे यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करीत असलेल्या सचिन भागवत गिरी याने दिलेल्या माहितीनुसार कृष्णा चामे यांना एका अज्ञात व्यक्तीने दुचाकी वर बसवून नेल्याचे समोर आले.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड