नवी दिल्ली, 26 डिसेंबर (हिं.स.) - माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती चिंताजनक झाली. त्यामुळे त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर इमर्जन्सी वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. ते 92 वर्षांचे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मनमोहन सिंग यांना आज, गुरुवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास एम्सच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास होत असून त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले आहे. डॉक्टरांचे विशेष पथक त्यांची तपासणी करत आहे. त्यांना अनेक दिवसांपासून आरोग्य विषयक समस्यांचा सामना करावा लागत आहे. याआधीही प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मनमोहन सिंह यांनी सलग दोन वेळा देशाचे पंतप्रधानपद भूषवले आहे. त्यांनी २००४ ते २०१४ दरम्यान काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारचे नेतृत्व केले. त्याआधी पीव्ही नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांनी १९९१-९६ या काळात अर्थमंत्री म्हणूनही काम केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी