रत्नागिरी, 27 डिसेंबर, (हिं. स.) : येथील भारत शिक्षण मंडळाच्या देव,घैसास ,कीर कला वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सात दिवसीय श्रमसंस्कार निवासी शिबिराच्या स्वयंसेवकांनी उमरे-ब्राह्मणवाडी (ता. रत्नागिरी) येथे जलसंवर्धन करण्यासाठी वनराई बंधारा बांधला व पाणवठ्याची स्वच्छता केली.
यामध्ये स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि श्रमदानाचा आनंद घेतला. दुपारच्या सत्रामध्ये व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत नवनिर्माण कॉलेजचे प्राध्यापक सुशील साळवी यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी विविध प्रकारचे खेळ आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मुलांना व्यक्तिमत्त्वात कोणते गुण असावेत हे सांगितले. या सत्रातून स्वयंसेवकांना संघभावना आणि उत्तम समन्वय कसा असावा, हे सांगितले.
संध्याकाळी राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डॉ. राहुल मराठे यांनी शिबिराला सदिच्छा भेट दिली. आवाजाचा उपयोग आपण करिअर साठी कसा करू शकतो, याबद्दल मराठे यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / बाळकृष्ण कोनकर