रत्नागिरी, 27 डिसेंबर, (हिं. स.) : रायपाटण (ता. राजापूर) येथील मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी फारशी रहदारी नसलेल्या येरडव ते अणुस्कुरा या सुमारे तीन-चार किमी लांबीच्या ऐतिहासिक शिवकालीन पायवाटेची श्रमदानाने स्वच्छता केली. तेव्हा या शिवकालीन पायवाटेवरील पुरातन पांडवकालीन श्री उगवाई देवीचे मंदिर, मराठी भाषेचा अनमोल ठेवा असलेला आणि शिवकाळातील चौथाई सरदेशमुखीचे अधिकार दिल्याचे निर्देशन करणारा सुमारे अडीचशे वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक शिलालेख, सतत वाहणारा पाण्याचा झरा आदी शिवकालीन ऐतिहासिक ठेवा सापडल्याने शिवकालीन इतिहास आता पुन्हा उलगडण्यास मदत झाली आहे.
येरडव ते अणुस्कुरा या शिवकाळामध्ये रहदारी असलेल्या आणि सध्या बंद होऊन दुर्लक्षित राहिलेल्या या पायवाटेने छत्रपती शिवाजी महाराज कोकणात आल्याचे सांगितले जाते. छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यासाठी आलेले मुगल सैन्यही या पायवाटेने कोकणात खाली उतरल्याचे सांगितले जाते. या पायवाटेवरील तपासणी नाक्याच्या खाणाखुणा पाहता या पायवाटेने शिवकाळामध्ये वाहतूकही झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र त्याबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या या पायवाटेवरील आणि अणुस्कूरा घाटाच्या माथ्यावर असलेला हा शिवकालीन ऐतिहासिक ठेवा पाहताना या ठिकाणावरून कोकण परिसर, अर्जुना धरण प्रकल्प आणि निसर्गसौदर्य अनुभवण्याची संधी पर्यटकांना मिळणार असल्याने भविष्यामध्ये शिवप्रेमी, पर्यटकांसह हौशी ट्रेकर्सची पावले या परिसराकडे वळणार आहेत.
घाटमाथ्यावरून कोकणामध्ये येणार्या अनेक पायवाटा आहेत. मात्र कालौघात रहदारी कमी झाल्याने या पायवाटा दुर्लक्षित राहिल्या आहेत. त्यापैकी एक असलेली तालुक्यातील येरडव ते अणुस्कुरा ऐतिहासिक शिवकालीन पायवाट आहे. पाचल-येरडवमार्गे अणुस्कुरा घाटाच्या माथ्यावर जात मुख्य घाटमार्गाला जोडल्या जाणाऱ्या सुमारे चार किलोमीटरच्या पायवाटेचा प्रवासासाठी वाहने उपलब्ध नसलेल्या कालखंडामध्ये कोकणातून घाट परिसरामध्ये जा-ये करण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून उपयोग केला जात असल्याचे सांगितले जात आहे. अणुस्कुरा घाटमार्गाचे काम करताना अन्य पायवाटांप्रमाणे येरडव-अणुस्कुरा ही पायवाटही बंद झाली. या शिवकालीन पायवाटेसह या मार्गावरील ऐतिहासिक ठेव्याचे जतन आणि संवर्धन होण्यासाठी शासनाने आता पुढाकार घेणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
येरडव ते अणुस्कुरा या शिवकालीन पायवाटेवर अणुस्कुरा घाटमाथ्यावर असलेले श्री उगवाई देवीचे मंदिर, या मंदिरात असलेली श्री शंकराची पिंडी, ज्या पायवाटेने शिवकाळामध्ये वाहतूक चालायची तो तपासणी नाका, अवखळपणे वाहणारा पाण्याचा झरा, एक व्यक्ती आत जाईल एवढी रुंद असलेली गुहा, ऐतिहासिक माहिती देणारा शिलालेख, येरवड येथील प्रसिद्ध श्री दत्तमंदिर पाहता येईल. ही पायवाट आगामी काळात ग्रामस्थांच्या साथीने दुरुस्त करण्याचा महाविद्यालयाचा मानस आहे असे, मनोहर हरी खापणे महाविद्यालयातील प्रा. विकास पाटील यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / बाळकृष्ण कोनकर