अटकेची भीती दाखवत पैसे लुटणाऱ्या बाप-लेकांना नाशिक पोलिसांनी केली अटक
नाशिक , 27 डिसेंबर (हिं.स.) - होम अरेस्टची भीती दाखवून शहरातील वयोवृद्ध महिलेला सायबर भामट्यांनी २३ लाख रुपयांना गंडा घातल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी तपास करत ज्या बँक खात्यावर पैसे ट्रान्सफर झाले त्या खातेदाराला शोधून काढले आहे. तसेच तपासात अने
अटकेची भीती दाखवत पैसे लुटणाऱ्या बाप-लेकांना नाशिक पोलिसांनी केली अटक


नाशिक , 27 डिसेंबर (हिं.स.) - होम अरेस्टची भीती दाखवून शहरातील वयोवृद्ध महिलेला सायबर भामट्यांनी २३ लाख रुपयांना गंडा घातल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी तपास करत ज्या बँक खात्यावर पैसे ट्रान्सफर झाले त्या खातेदाराला शोधून काढले आहे. तसेच तपासात अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या असून ताब्यात घेतलेले बैंक खातेदार हे बाप-लेक असल्याचे समोर आले आहे. ते उत्तर प्रदेशातील कनौजमधील असून नाशिक शहर सायबर पोलिसांनी या बाप- लेकाचा इंदूर पोलिसांकडून ताबा घेतला. न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. चौकशीत बाप-लेकांनी सायबर सूत्रधाराचे नाव सांगितले असून, पोलीस त्याच्या मागावर आहेत.

मुलगा असद अहमद खान (३६, दोघे रा. कनौज, उत्तर प्रदेश), वडील अली अहमद खान (५९) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. नाशिक शहरातील ६० वर्षीय एका महिलेस १३ डिसेंबर रोजी सायबर भामट्याने कॉल करत डिजिटल अरेस्ट केले. अटकेची भीती दाखवत तिच्याकडून २३ लाख रुपये उकळले, फसवणूक झाल्याने महिलेने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात ज्या बँक खात्यावर पैसे गेले ते मदरशाचे असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी बाप-लेकांना शोधून काढत त्यांचे बँक खाते गोठवले.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, बरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे, पोलीस निरीक्षक रियाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक राहुल मोरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम चव्हाण, पोलीस अंमलदार किरण घाडगे, विकास पाटील यांनी केली.

सायबर चोरट्याने मदरशाच्या बाप-लेकांना जाळ्यात ओढल्यानंतर मदरशाच्या नावाने लिंक तयार केली. त्याद्वारे त्याने सोशल मीडियावर आर्थिक मदतीचे आवाहन केल्याचे पोलीस तपासात समोर आले. प्रत्यक्षात ही लिंक सायबर फसवणूक असल्याचे अनेकांना उशिरा समजले. तोपर्यंत अनेकांच्या बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर झाले. नाशिक शहर सायबर पोलिसांनी अटक केलेल्या बाप-लेकाचे नाशिक शहर, इंदर (मध्य प्रदेश), छत्तीसगड, चेनई (तामिळनाडू) येथील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. डिजिटल अरेस्टप्रकरणी इंदौर पोलिसांनी आधी बाप-लेकांना अटक केली होती.

अशी घडली होती घटना

नाशिकमधील ६० वर्षीय महिलेस अनोळखी मोबाईल क्रमांकावरून व्हॉटस्अॅप कॉल आला. समोरील व्यक्तीने दिल्लीतील क्राईम ब्रँचमधून बोलत असल्याचे सांगत मनी लॉड्रिगमधील कमिशन बैंक खात्यावर आल्याचे सांगितले. तुम्हाला केव्हाही अटक होऊ शकते, तुमच्या घराबाहेर पोलीस आहेत. संशयित संदीपकुमारच्या तपासात तुमचे नाव समोर आले आहे. त्याने दिलेले कमिशन तुमच्या बँक खात्यावर जमा आहे. तुमच्या जीवाला धोका आहे. त्यांना तुमच्या खात्यावरील पैसे पाहिजे आहेत. तुमच्या बैंक खात्यातील पैसे आम्ही सांगतो त्या खात्यावर पाठवा. तपास झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांमध्ये तुमचे पैसे तुम्हाला परत पाठवले जातील, हे बोलणे ऐकून महिला भयभीत झाली. अनोळखी व्यक्तीने पाठवलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या खात्यावर महिलेने चेकद्वारे तब्बल २३ लाख रुपये पाठवले.

दिल्लीत बापलेक अन् सूत्रधाराची भेट

बैंक खात्यावर पैसे जमा होण्याआधी संशयित आरोपी बापलेक आणि सूत्रधाराची दिल्लीतील पहाडगंजमध्ये भेट झाली होती. यावेळी सूत्रधार व्यक्तीने कमिशनच्या बदल्यात बैंक खात्याचा तपशील घेतल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande