अमरावती, 28 डिसेंबर (हिं.स.)।
नगर पालिका प्रशासनाच्या वतीने चौथ्यांदा नवीन चतुर्थ वार्षिक मालमत्ता कर आकारणी प्रारूप तयार करून यादी प्रसिद्ध केली. त्यानंतर मालमत्ता धारकांना नोटीस देत हरकती आक्षेप नोंदवण्याचे आवाहन केले होते. कल्याण मंडपम येथे सुनावणीप्रसंगी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने पालिका प्रशासनाने ऐन वेळेवर ही सुनावणी रद्द केल्याने गोंधळ निर्माण झाला.
अचलपूर नगर पालिकेने २०२४-२५ ते २०२७-२८ या चार वर्षांसाठी पालिका क्षेत्रातील इमारती व भूखंडांच्या कर निर्धारणासाठी झोननिहाय वसुली याद्या तयार केल्या. मूल्य निर्धारण अधिकारी अचलपूर नगर परिषद व नगर रचनाकार अमरावती यांनी याद्यांची तपासणी करून नागरिकांना नोटीस बजावत २४ डिसेंबरपर्यंत आक्षेप अर्ज मागक्ले होते. १८, १९ व २० डिसेंबरला हरकती व सुनावणीची प्रक्रिया सुरू केली होती. बहुतांश नागरिकांनी हरकती नोंदवल्या. पालिकेत जवळपास नव्या कर निर्धारणांतर्गत ३६ हजार मालमत्ताधारक आहेत. ६ हजार मालमत्ताधारकांना हरकती संदर्भातील नोटीस प्राप्त झाली नाही. नगरपालिकेने नेमलेल्या पीएमसीच्या कामकाजावर नागरिकांनी आक्षेप घेतला आहे. बहुतांश मालमत्ता धारकांना प्राप्त झालेला मालमत्ता कर चुकीचा आहे. ते सर्वेक्षणही चुकीचे केले, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. पालिकेच्या वतीने कल्याण मंडपम येथे सुनावणी सुरू होताच नोटीस दिलेल्या नागरिकांसोबतच अन्य नागरिकांची गर्दी झाली होती. त्यामुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाला. या ठिकाणी एकच पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी असल्याने नाइलाजास्तव पालिका प्रशासनाला २७ व २८ डिसेंबरची सुनावणी रद्द करावी लागली.
सुनावणीच्या तारखा कळवणार
अचलपूर नगर पालिकेच्या वतीने मालमत्ता कर निर्धारणासंदर्भातील प्रक्रिया तूर्तास रद्द केली असून, लवकरच पुढील सुनावणी संदर्भातील तारखा मालमत्ता धारकांना रितसर कळवण्यात येतील. २७ व २८ डिसेंबर रोजीची सुनावणी रद्द केली आहे. याची नागरिकांनी दखल घ्यावी. प्रत्येक मालमत्ता धारकांचे म्हणणे प्रशासन विचारात घेईल, असे कर निरीक्षकांनी कळवले आहे.
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी