रत्नागिरी, 30 डिसेंबर, (हिं. स.) : चतुरंग अभ्यासवर्गाचे प्रेरणास्थान असलेल्या गुरुवर्य स्व. एस. वाय. गोडबोले गुरुजींच्या नावाने २४ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या चतुरंगच्या सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्काराच्या निवडी संदर्भातील ग्रुप इंटरव्ह्यू चतुरंगच्या चिपळूण कार्यालयात पार पडले. त्यातून ३४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
यावर्षी ५४ शाळांतील २०३ विद्यार्थी या मुलाखतीसाठी उपस्थित होते. भगीरथ ग्रामविकास संस्थेचे संस्थापक डॉ. प्रसाद देवधर, पोलीस हेडकॉन्स्टेबल रमा करमरकर आणि डॉ. मिलिंद गोखले या तिघांनी यावर्षी निवड समिती सदस्य म्हणून काम केले. शाळांना दिलेल्या वेळेनुसार सर्व शाळांनी हजेरी लावली आणि अतिशय शिस्तबद्ध अशा ह्या मुलाखती पार पडल्या.
यावर्षी ३४ विद्यार्थ्यांची निवड ह्या पुरस्कारासाठी झाली आहे. हा पुरस्कार सोहळा रविवार, दि. १९ जानेवारी २०२५ रोजी चिपळूण येथे होणार असल्याचे चतुरंगच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
हिंदुस्थान समाचार / बाळकृष्ण कोनकर