सोलापूर, 30 डिसेंबर (हिं.स.) : राज्यात गुटखा विक्री बंदी असताना शहरात राहत्या घरामध्ये गुटखा ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस पथकाने छापा टाकून १ लाख २६ हजार रुपये किमतीचा ३६ पोत्यांमध्ये ठेवलेला गुटखा जप्त केला आहे. बार्शी शहर पोलिसांत व्यापाऱ्यासह विक्रेत्यावर गुन्हा दाखल झाला आहे.सचिन शिवप्पा गावसाने (रा. वाणी प्लॉट, बार्शी), व्यापारी राम डोंबे (रा. बार्शी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अन्न प्रशासन विभाग सोलापूरच्या सहायक आयुक्त नंदिनी हिरेमठ यांनी फिर्याद दाखल केली. शहरातील वाणी प्लॉट येथील राहत्या घरी गुटख्याची पोती असल्याची माहिती पोलिसांना समजताच पोलिसांनी छापा टाकून गुटखा पकडला.पोलिस उपनिरीक्षक महेश गळगटे यांनी अन्न प्रशासन विभागाला पत्राद्वारे या प्रकरणाची माहिती दिली. जप्त केलेल्या ३६ पोत्यांमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला केआर १०० वर्णनाचा गुटखा सदृश माल आहे. विविध प्रतिबंधित पदार्थ विक्रीसाठी जवळ बाळगला, जनहित व जनआरोग्याच्या दृष्टिकोनातून काढलेल्या आदेशाची अवज्ञा व उल्लंघन केले आहे. ---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड