छत्रपती संभाजीनगर, 30 डिसेंबर (हिं.स.)।
उद्योगात काम करणाऱ्या कामगारांची सुरक्षा राखणे हे कायद्याने बंधनकारक आहे. कामगारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत यासंदर्भात एक जिल्हास्तरीय समिती तयार करुन या समितीने सर्व आस्थापनांमध्ये तपासणी पाहणी करावी व तसा अहवाल दरमहा सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे दिले.
औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचा आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे होते. निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, औद्योगिक सुरक्षा विभागाचे सहसंचालक प्र.वि. सुरसे, उपसंचालक धिऱा. खिरोडकर, सहा. संचालक गायकवाड, ग.बा. पाचवणे, कामगार कल्याण अधिकारी चंद्रकांत राऊत यावेळी उपस्थित होते.महाराष्ट्र कारखाने नियम व महाराष्ट्र कारखाने नियम २००३ अन्वये कारखान्यांचे कामकाज व कामगारांची सुरक्षा याबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजना व आवश्यक तपासण्या व कारवाई बाबत माहिती देण्यात आली. धोकादायक व अतिधोकादायक कारखान्यांमधील कामगारांची सुरक्षा वेळोवेळी तपासणी होणे आवश्यक असून कामगार व औद्योगिक सुरक्षा अधिनियमानुसार ते बंधनकारकही आहे. याबाबत कामगारांमध्ये तसेच आस्थापना चालकांमध्ये जनजागृतीपर उपक्रम राबवावे. कामगारांना आपल्या सुरक्षा उपाययोजनांविषयी प्रशिक्षित करावे. याबाबत प्रत्येक आस्थापनेत होत असलेल्या सुरक्षा उपाययोजनांच्या अंमलबजावणीच्या तपासणीसाठी एका समितीचे गठन करावे व त्या समितीने आपला अहवाल दरमहा सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.
हिंदुस्थान समाचार / मेघा माने