जळगावात मोलकरणीने डॉक्टरच्या घरातून २४ लाख चोरले 
जळगाव, 30 डिसेंबर (हिं.स.) शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मोलकरणीने टप्प्याटप्प्याने डॉक्टराच्या घरातून २४ लाख रुपयांचा मोठा ऐवज चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. छायाबाई संग्राम विसपुते असे संशयित चोरी करणाऱ्या महिलेचं नाव असून याबाबत जिल्ह
जळगावात मोलकरणीने डॉक्टरच्या घरातून २४ लाख चोरले 


जळगाव, 30 डिसेंबर (हिं.स.) शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मोलकरणीने टप्प्याटप्प्याने डॉक्टराच्या घरातून २४ लाख रुपयांचा मोठा ऐवज चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. छायाबाई संग्राम विसपुते असे संशयित चोरी करणाऱ्या महिलेचं नाव असून याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.डॉ. प्रकाश बुधा चित्ते हे जळगाव शहरातील विवेकानंद नगर येथे ‘श्री संतुलन’ हॉस्पिटल चालवतात. वैद्यकीय सेवा करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. सुमारे चार वर्षांपूर्वी, त्यांच्या मित्राने घरकामासाठी छायाबाई विसपुते नावाच्या महिलेला त्यांच्याकडे पाठवले. छायाबाईने वर्षभर नीटनेटके घरकाम करून डॉक्टर परिवाराचा विश्वास संपादन केला होता. तिला साफसफाई, कपडे धुणे, आणि लहान मुलांना सांभाळण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. याचा फायदा घेऊन तिने मे २०२४ पासून घरातून रोकड व सोन्याचे बिस्कीट चोरण्याचा धंदा सुरू केला.

छायाबाईने घरातील कपाट व तिजोरीच्या चाबीची ड्युप्लिकेट चाबी बनवून घेतली होती. तिने रोकडीच्या बंडलमधून मोजक्या नोटा गायब करून चोरी करण्याचा मार्ग अवलंबला होता, ज्यामुळे घरात चोरी होत असल्याचे लक्षात येऊ नये. गेल्या महिन्यात डॉक्टरांनी ५२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट सराफ बाजारातून विकत घेतले होते, जे त्यांनी रात्री पॅन्टच्या खिशात ठेवले होते. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांना कामानिमित्त बाहेर जावे लागल्याने त्यांचे कपडे धुण्यासाठी टाकण्याचे काम पत्नी किंवा छायाबाई या दोघींनी केले होते. पत्नीला विचारल्यावर तिने नाही म्हटल्यावर डॉक्टरांचा संशय छायाबाईवर आला आणि तिथेच तिचे बिंग फुटले. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

छायाबाईने चोरलेल्या पैशातून स्वत:साठी मोपेड, नवऱ्याला बाईक, आणि १२ लाखांचा वेलफर्निश फ्लॅट बुक केला होता. नव्या घरात फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशिन, आटा चक्की आदी वस्तू खरेदी केल्या होत्या. तिचा पेहरावही बदलला होता. या सर्व खरेद्यांमुळे तिच्या चोरीच्या पैशाचा पितळ उघड झाला. ही घटना उघडकीला आल्यानंतर डॉ. प्रकाश चित्ते यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून छायाबाई संग्राम विसपुते (वय 39, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) हिच्यावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande