रत्नागिरी : निवळी गावातील विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका
रत्नागिरी, 30 डिसेंबर, (हिं. स.) : निवळी (ता. रत्नागिरी) येथील गावडेवाडीत जाकादेवी मंदिरालगत ८० फूट विहिरीत पडलेल्या नर बिबट्याला वन विभागाने पिंजऱ्यातून सुरक्षितपणे वर आणले व त्याला वाचवले. हा बिबट्या सुमारे चार वर्षांचा असून त्याला वैद्यकीय तपासणी
पकडलेला बिबट्या


रत्नागिरी, 30 डिसेंबर, (हिं. स.) : निवळी (ता. रत्नागिरी) येथील गावडेवाडीत जाकादेवी मंदिरालगत ८० फूट विहिरीत पडलेल्या नर बिबट्याला वन विभागाने पिंजऱ्यातून सुरक्षितपणे वर आणले व त्याला वाचवले. हा बिबट्या सुमारे चार वर्षांचा असून त्याला वैद्यकीय तपासणीनंतर वन विभागाने नैसर्गिक अधिवासात सोडले.

याबाबत वन खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार किरण रघुनाथ साळवी यांच्या किरण फार्म हाऊसमधील आंबा कलम बागेत पंप हाऊसशेजारी असलेल्या उघड्या विहिरीमध्ये बिबट्या पडला. याबाबत निवळीचे सामाजिक कार्यकर्ते संजय निवळकर, पोलिस पाटील श्रीमती पवार यांनी वन विभागाला माहिती दिली. त्याप्रमाणे विनाविलंब वन विभाग रेस्क्यू टीम साहित्य घेऊन शासकीय वाहनांमध्ये पिंजऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले.

विहीर साधारण ८० फूट खोल व १८ फुटाची गोलाई आहे. पाणी साधारणपणे १० फूट होते. बिबट्या विहिरीत पाण्याच्या वर सुरक्षित होता. बिबट्याला वाचवण्यासाठी दोऱ्या बांधून पिंजरा विहिरीत सोडण्यात आला आणि साधारण एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर पिंजऱ्याचा दरवाजा बंद करण्यात वन विभागाला यश आले. हा पिंजरा विहिरीबाहेर काढला व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वैद्यकीय तपासणी केली.

बचावाची कार्यवाही विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कामगिरीसाठी प्रकाश सुतार परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी, पाली येथील वनपाल न्हानू गावडे उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / बाळकृष्ण कोनकर


 rajesh pande