सोलापूर, 30 डिसेंबर (हिं.स.) : दारूच्या नशेत मागील भांडणाच्या रागातून दोघांनी युवराज प्रभुलिंग स्वामी (वय १९, रा. शिवगंगा नगर, शेळगी) याचा खून केल्याची घटना घडली. ओळखीच्या दोघांनी युवराजला घराबाहेर बोलावून दुचाकीवर बसवून नेले होते. पोलिसांनी काही तासांतच दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले, पण त्यातील एकजण अल्पवयीन आहे. त्यामुळे पोलिसांनी विजय ऊर्फ सोनू बनसोडे याला अटक केली.मृत युवराजचा मित्र विजय ऊर्फ सोनू बनसोडे व त्याच्या ओळखीचा एक अल्पवयीन मित्र, या दोघांनी रात्री दहाच्या सुमारास युवराजला दुचाकीवर बसवून नेले. तिघेजण घरापासून काही अंतरावरील मित्रनगर, शेळगी परिसरातील निर्मल डेव्हलपर्सच्या मोकळ्या जागेत गेले. त्याठिकाणी मद्यपान केले आणि थोड्या वेळाने मागील भांडणाच्या रागातून त्या दोघांनी युवराजसोबत वाद घालायला सुरवात केली.त्यानंतर त्या दोघांनी तेथील मोकळ्या जागेतील प्लॉट दर्शविण्यासाठी वापरलेल्या स्टिलच्या स्टॅण्डने कपाळावर, डोळ्यावर, तोंडावर जोरात युवराजला मारहाण केली. या जबर मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या युवराजचा जागीच मृत्यू झाला. जोडभावी पेठ पोलिसांना घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण, पोलिस निरीक्षक शबनम शेख यांनी अंमलदारांसह घटनास्थळी धाव घेतली. ---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड