पाकिस्तानात आत्मघातकी हल्ला, पाच चिनी नागरिकांसह सहा जणांचा मृत्यू
इस्लामाबाद, २६ मार्च (हिं.स.) : पाकिस्तानामधील खैबर पख्तुनख्वा भागातील शांगला जिल्ह्यात एक मोठा आत्म
हल्ला


इस्लामाबाद, २६ मार्च (हिं.स.) : पाकिस्तानामधील खैबर पख्तुनख्वा भागातील शांगला जिल्ह्यात एक मोठा आत्मघातकी हल्ला झाला. या हल्ल्यात पाच चिनी नागरिकांसह सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

पाकिस्तानमध्ये दोन दिवसात सलग दुसरा मोठा हल्ला आहे. चीनी नागरिकांना लक्ष्य करण्यासाठीच हा हल्ला केला गेल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या हल्ल्यामुळे पाकिस्तानमध्ये एकच घबराट पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चिनी नागरिकांच्या वाहनांना लक्ष्य करून हा आत्मघाती हल्ला करण्यात आला आहे. हा आत्मघाती हल्ला अशा वेळी झाला आहे, जेव्हा काही तासांपूर्वी बलुचिस्तानमधील पाकिस्तानच्या दुसऱ्या सर्वांत मोठ्या नौदल तळावर दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये एका जवानाचा मृत्यू झाला, तर सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला.

खैबर पख्तुनख्वामधील शांगलाच्या बिशाम तहसीलमध्ये स्फोटकांनी भरलेल्या वाहनाने दुसऱ्या वाहनाला धडक दिली, त्यानंतर हा मोठा स्फोट झाला. या घटनेच्या समोर आलेल्या छायाचित्रात स्फोटानंतर एक वाहन खड्ड्यात पडताना दिसत आहे. स्फोटामुळे वाहनाला आग लागली. ज्या वाहनाला लक्ष्य करण्यात आले. त्यात अनेक चिनी नागरिक प्रवास करत होते, त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी, आणखी एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. यानंतर परिसरात एकच आफरातफर माजली. स्फोटानंतर जाळ आणि धूर निघाला. त्यामुळे नागरिक घाबरले आणि जीव मुठीत घेऊन सैरावैरा धावू लागले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande