ज्ञान, जाण आणि भान आचरणात हवे- सरसंघचालक
नागपूर, 18 एप्रिल (हिं.स.) : हिंदू धर्मातील ज्ञान, आपण कोण आणि आपले कोण जाची जाण आणि जीवनध्येयाचे भा
डॉ. मोहन भागवत


नागपूर, 18 एप्रिल (हिं.स.) : हिंदू धर्मातील ज्ञान, आपण कोण आणि आपले कोण जाची जाण आणि जीवनध्येयाचे भान आचरणात उतरले पाहिजे असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. नागपुरातील रेशीमबाग इथल्या महर्षी व्यास सभागृहात आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महानगर संघचालक राजेश लोया, प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर आणि रमेश पतंगे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकी वाटचालीवर प्रकाश टाकणाऱ्या “हिंदुराष्ट्राच्या जीवनोद्देशाची क्रमबद्ध अभिव्यक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ” या ग्रंथाचे प्रकाशन झाले. संघाच्या वाटचालीत योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील स्वयंसेवकांच्या समावेशासह आकाराला आलेल्या या ग्रंथावर भाष्य करताना सरसंघचालक म्हणाले की, भारतावर शक, हुण, यवन, मुगल आणि इंग्रज अशी सातत्याने परकीय आक्रमणे होत गेली. आपसातील भेद आणि गद्दारी यामुळे आम्ही नेहमीच परकियांना विजयी बनवत गेलो. तब्बल 2 हजार वर्षांची गुलामगिरी आणि संघर्ष यातून आत्मविस्मृती आलीय. आपण कोण आणि आपले कोण याचा विसर पडलाय. यातून आपण बाहेर पडले पाहिजे. भूतकाळातील चुकांची पुनरावृत्ती टाळली पाहिजे. आपल्याकडे हिंदु धर्माचे ज्ञान भरपूर आहे. पण त्या नुसार आचरण कोणी करीत नाही. म्हणून या आचारप्रवण हिंदु धर्माचे आचरण सर्वांनी शिकले पाहिजे. आपण कोण याची ओळख मनात जागती ठेवून आपला धर्म व संस्कृतीनुसार आचरण केले पाहिजे. तर परिस्थितीत तगण्याची क्षमता आपल्यात येईल असे सरसंघचालकांनी सांगितले.

संघाची स्थापना झाली त्यावेळची परिस्थिती आणि वर्तमानातील स्थिती यात जमीन-अस्मानचे अंतर आहे. सुरुवातीच्या काळात सामान्य स्वयंसेवकांपासून ते सरसंघचालकांपर्यंत सर्वांनाच वंचना, विरोध आणि अभावाला सामोरे जावे लागले होते. परंतु, आजची परिस्थिती बदलली आहे. संघाची समाजात स्वीकार्यता वाढली असून साधनांची रेलचेल आहे. परंतु, संघ स्थापन करण्यामागचे जे ध्येय होते ते सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. समाजाचे संघटन असलेल्या संघाला समाजाचा विजय आसुरी किंवा धनाच्या बळावर मिळालेला नसावा तर धर्मविजय अपेक्षित आहे. संघाच्या संदर्भात सांगितलेले “एन इव्हॅल्युशन ऑफ लाईफ मिशन ऑफ हिंदू नेशन” अर्थात हिंदुराष्ट्राच्या जीवनोद्देशाची क्रमबद्ध अभिव्यक्ती म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे लक्षात घेऊन त्यानुसार आचरण आणि विवेकपूर्ण जीवन जगावे असे आवाहन सरसंघचालकांनी यावेळी केले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande