तीन लाखांच्या मताधिक्याने निवडून येणार - नारायण राणे
रत्नागिरी, 19 एप्रिल, (हिं. स.) : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात तीन लाखांच्या मताधिक्याने म
नारायण राणे


रत्नागिरी, 19 एप्रिल, (हिं. स.) : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात तीन लाखांच्या मताधिक्याने मी निवडून येणार आहे, असा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज येथे व्यक्त केला.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी या मतदारसंघातून आज त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले, माझा कार्यकर्ता हा माझा अभिमान आहे. आज माझ्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी एवढ्या रणरणत्या उन्हातही आपण हजारोच्या संख्येने उपस्थित राहिलात. मिळेल त्या वाहनाने मिळेल, त्या गाडीने तहानभूक विसरून या मिरवणुकीत सहभागी झालात आणि महायुतीचा उमेदवार म्हणून मला जो पाठिंबा दिलात, जे सहकार्य केलेत, हे प्रेम पाहून मी भारावून गेलो आहे. तुमच्या या उत्स्फूर्त पाठिंब्याने माझा विजय निश्चित झाला आहे.

श्री. राणे म्हणाले, महायुतीचा उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे शिवसेना, अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी आणि घटक पक्षांच्या वतीने मला उमेदवारी देण्यात आली आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित राहून गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम अशा सर्वच महायुतीच्या नेत्यांनी या ठिकाणी उपस्थिती लावली. मला पाठिंबा दिला आणि या लोकसभा निवडणुकीत विजयाचा विश्वास दिला, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो.

भारतीय जनता पार्टीने मला उमेदवारी दिली त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही आभार मानतो, असे त्यांनी सांगितले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande