नागपुरात गडकरींसह मान्यवरांनी केले मतदान
नागपूर, 19 एप्रिल (हिं.स.) : लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. यामध्ये महाराष्ट
गडकरी कुटुंबियांनी केले मतदान


नागपूर, 19 एप्रिल (हिं.स.) : लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 5 लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. ज्यामध्ये भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर, नागपूर, रामटेक या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. नागपुरात नितीन गडकरी, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि देवेंद्र फडणवीसांसह दिग्गजांनी मतदानाचा हक्क बजावला. शहरात सकाळी 9 वाजेपर्यंत 7.73 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली.

नागपूर शहरातील महाल परिसरातल्या टाऊन हॉलमध्ये केंद्रीय मंत्री व भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी कुटुंबियांसह मतदान केले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी कांचन, निखील-सारंग ही मुले, सुना यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणावर सुरक्षाव्यवस्था तैनात होती. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरमपेठ हिंदी प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. त्यांच्यासोबत त्यांच्या आई सरिता व पत्नी अमृता यांनीदेखील मतदानाचे कर्तव्य बजावले. नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री येणार म्हणून त्या कालावधीत केंद्रावर जास्त प्रमाणात मतदार मतदान करण्यासाठी आले होते. काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी कुटुंबियांसह मतदान केले. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील कुटुंबियांसह कोराडी येथील ग्रामपंचायत कार्यालय सभागृहात जाऊन मतदानाचा हक्क बजावला.पंजाबचे ज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनीदेखील वनामतीजवळील धरमपेठ हिंदी उच्च प्राथमिक शाळेत सकाळी 11 वाजेच्या सुमारास मतदान केले. तसेच राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का आणि माजी संचालिका प्रमिलताई मेढे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande