कॉंग्रेस-इंडी आघाडीला मत म्हणजे मत वाया जाणे - पंतप्रधान
वर्धा, 19 एप्रिल (हिं.स.) - कॉंग्रेसच्या पापांचा घडा भरलाय. कॉंग्रेस-इंडी आघाडीला मत म्हणजे मत वाया

PM Modi Wardha 
 
 

वर्धा, 19 एप्रिल (हिं.स.) - कॉंग्रेसच्या पापांचा घडा भरलाय. कॉंग्रेस-इंडी आघाडीला मत म्हणजे मत वाया जाणे आहे. कॉंग्रेसची नेहमी विकासविरोधी भूमिका राहिली आहे. बारश्याला गेला आणि बाराव्याला आला अशी असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. वर्धा येथे आयोजित प्रचार सभेला त्यांनी संबोधित केले.

 
यावेळी व्यासपिठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमरावती लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा व वर्धा लोकसभेचे भाजप उमेदवार रामदास तडस यांसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
 
मोदी म्हणाले की, विरोधकांकडे विरोध करायला मुद्दाच राहिला नाही. त्यामुळे ते शिवीगाळीचे व देशाला बदनाम करण्याचे राजकारण करत आहे. एनडीएने गेल्या दहा वर्षांत केलेल्या देशातील विकासामुळे विरोधकांचे तोंड बंद झाले आहे. आता यापुढे विदर्भाला कॉंग्रेसच्या धोरणाचे मोठे धोके सहन करावे लागणार नाही. महाराष्ट्रातील लोकांनी व देशातील जनतेने ठरवून टाकले आहे की, विकासाला मतदान करायचे आहे. देशातील सर्व विकासाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी फिर एक बार ४०० पार, असा नारा यावेळी नरेंद्र मोदी यांनी दिला. असे त्यांनी सांगितले.
 

विकसित भारताची मुहूर्तमेढ रोवणारी ही निवडणूक

 
२०२४ ची लोकसभा निवडणूक ही आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीची आहे, विकसित भारताची मुहूर्तमेढ रोवणारी ही निवडणूक आहे. यात वर्धा व अमरावती लोकसभेतील लोकांच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे, असे प्रतिपादन केले.
 

वर्धा ही संतांची भूमी

 
वर्धा ही संतांची भूमी आहे. देशातील लोकांना असे वाटत होते की, देशाचा विकास होऊच शकत नाही. शेतकऱ्यांना असे वाटत होते की, त्यांच्या मालाला किंमत मिळणार नाही. पण ज्यांना कोणीही विचारले नाही, त्यांना गरीबाच्या या मुलाने विचारले. आतापर्यंत सुमारे २५ टक्के लोकांना गरीबीतून बाहेर काढले आहे. गावोगावी वीज पुरवठा पोहोचवला आहे. ११ कोटी लोकांना पाणी पुरवठा केला. ४ कोटी लोकांना पीएम आवास योजना मिळाली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
 

विदर्भात आता चांगला विकास

 
वर्धा, सेवाग्राम, हिंगणघाट या भागात चांगली रेल्वे सेवा झाली आहे. वर्धा-यवतमाळ-वाशिम या भागात रेल्वेचे जाळे विणले जात आहे, या भागाचा विकास होत आहे. अमरावतीमध्ये टेक्सटाईल्स पार्क देखील बनवले जात आहे. त्यामुळे विदर्भाचा आता चांगला विकास होत आहे आणि लवकरच होणार आहे, असे मोदी म्हणाले.
 
महामार्ग-द्रुतगती महामार्ग हे या भागातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी समृद्धी ठरणार असल्याचेही ते म्हणाले.

मोदी म्हणाले की, चांद्रयान पाहिले आता गगनयान देखील पाहिले जाणार आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये आम्ही स्वयंसहाय्यता समूहाचे जाळे विणले. वर्ध्यातील महिलांनाच १२०० कोटींची मदत पाठवली आहे. महिलांच्या विकासासाठी आम्ही नवनवीन उपक्रम राबवणार आहे. तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार आहे. गावागावातील महिलांना ड्रोन पायलट बनवणार आहोत, हीच तर आमची हमी आहे, अशी ग्वाही मोदी यांनी दिली. हमी देण्यासाठी मोठी हिंमत लागते. माझ्यासाठी गॅरंटी हा तीन अक्षरांचा शब्दांचा खेळ नाही. माझ्यासाठी गॅरंटी म्हणजे क्षणक्षण देशासाठी लढणार असल्याचे मोदी म्हणाले.

 
मराठीतून भाषणाची सुरुवात
 

भारत माता की जय अशी घोषणाबाजी करत मोदींनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. त्यानंतर “चराचरांत वास करणारी, गुरुदेव शक्ती या सभेला उपस्थित सर्व बंधू-भगिनींना माझा जयगुरु, असं पंतप्रधान मोदी मराठीत म्हणाले. यानंतर त्यांनी वर्ध्याच्या भूमीत जन्माला आलेल्या महापुरुषांना नमन केलं. पंढरपूरच्या पांडुरंगाला देखील वंदन केलं. मोदींनी पांडुरंगाचं स्मरण करताना ‘रुप पाहतां लोचनी’ हा अभंग देखील म्हटला. “ही भूमी, अध्यात्म आणि राष्ट्रभक्तीच्या महासंगमची भूमी आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, लालूजी महाराज, संत मायबाई, आडकूजी महाराज असे अनेक किती अगणित महान संतांचे आशीर्वाद या भूमीत मिळाले आहेत. मी आज भाग्यशाली आहे की, या भूमीवर मला या सर्व पुण्य आत्म्यांना प्रणाम करण्याची संधी मिळाली.

 
“आज चैत्र एकादशी देखील आहे. पंढरपूरची आषाढी, कार्तिकी, चैत्र आणि माघी अशा चार यात्रा महत्त्वाच्या असतात. यापैकी आज चैत्र एकादशीची यात्रा आहे. आज प्रत्येक दिशेला गुंजत आहे, रुप पाहतां लोचनीं, सुख जालें वो साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. अशा पुण्यपर्वकाळात भगवान श्री विठ्ठलांच्या चरणी मी शतश: नमन करतो.”
 

हिंदुस्थान समाचार

 
 
 

 rajesh pande