राहुल गांधींना वायनाड देखील सोडावे लागेल- नरेंद्र मोदी
नांदेड, 20 एप्रिल (हिं.स.) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची वायनाडमधील सीट संकटात दिसते आहे. त्यांन
नरेंद्र मोदी, पंतप्रधान


नांदेड, 20 एप्रिल (हिं.स.) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची वायनाडमधील सीट संकटात दिसते आहे. त्यांना अमेठी प्रमाणेच वायनाड देखील सोडावे लागेल असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. नांदेड येथे आज, शनिवारी आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले,प्रतापराव चिखलीकर, महादेव जानकर, बाबुराव कदम आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघातून यंदा लोकसभा निवडणूक लढवत आहेत. यापूर्वी 2019 मध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघात त्यांचा पराभव झाला. भाजपा नेत्या स्मृती इराणी यांनी त्यांचा पराभव केला होता. नांदेडच्या सभेत पंतप्रधान म्हणाले की, काल देशात पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यांनी मतदान केले, विशेषत: ज्यांनी पहिल्यांदा मतदान केले त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. मतदानानंतर बूथ स्तरापर्यंत वेगवेगळ्या लोकांनी केलेले विश्लेषण आणि जी माहिती मिळत आहे. त्यातून पहिल्या टप्प्यात एनडीएच्या बाजूने एकतर्फी मतदान झाल्याचा विश्वास पक्का होत असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी विरोधकांच्या इंडी आघाडीवर टीका करताना मोदी म्हणाले की, इंडी आघाडीमधील लोक आपल्या भ्रष्टाचार पांघरूण घालण्यासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी कसे एकत्र आले आहेत हे मतदारही पाहत आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात मतदारांनी इंडी आघाडीला पूर्णपणे नाकारल्याच्याचे मोदींनी सांगितले.

या निवडणुकीत इंडी आघाडीच्या लोकांना उमेदवारच मिळत नाहीत. त्यांचे नेते बहुतांश जागांवर प्रचाराला जात नाहीत. हे काँग्रेस कुटुंब स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसलाच मतदान करणार नाही, कारण ते जिथे राहतात तिथे काँग्रेसचा उमेदवारच नाही. ज्या कुटुंबावर काँग्रेस चालते तेच कुटुंब काँग्रेसला मत देऊ शकणार नसल्याचे मोदी म्हणाले. यादेशातील 25 टक्के जागा अशा आहेत जिथे इंडी आघाडीतील घटक पक्ष एकमेकांवर कुरघोडी करताना दिसून येतात. एकमेकांना शिव्या घालतात. केरळचे मुख्यमंत्री ज्या पद्धतीने काँग्रेसच्या युवराजांवर टीका करीत आहेत त्यावरून असे वाटते की, त्यांना अमेठी प्रमाणेच वायनाड सोडून पळावे लागेल. इंडी आघाडीतील नेते 4 जून नंतर एकमेकांचे कपडे फाडतील असा टोलाही पंतप्रधानांनी यावेळी लगावला.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande