बीएमसीला मालमत्ता करापोटी ३५६९ कोटी रूपयांच्या महसूलाचे संकलन
मुंबई, 24 एप्रिल (हिं.स.) - सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा मालमत्ताकर कर संकलनाचे उद्दिष्ट एकूण ४ हजार
बीएमसी


मुंबई, 24 एप्रिल (हिं.स.) - सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा मालमत्ताकर कर संकलनाचे उद्दिष्ट एकूण ४ हजार ५०० कोटी रुपये आहे. तर कर भरणा करण्याचा अंतिम दिनांक २५ मे २०२४ आहे. यापैकी दिनांक २३ एप्रिल २०२४ पर्यंत सुमारे ३ हजार ५६९ कोटी रूपयांच्या मालमत्ताकराचे संकलन झाले आहे. निर्धारित लक्ष्य ४ हजार ५०० कोटी रूपयांच्या तुलनेत हे प्रमाण ७९ टक्के इतके आहे. देय दिनांकांच्या उर्वरित एक महिन्याच्या कालावधीत जनजागृती, थकबाकीदारांकडे पाठपुरावा करून १०० टक्के कर संकलन करण्याचा ठाम निर्धार महानगरपालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

मालमत्ताधारकांनी अंतिम देय मुदतीपूर्वी करभरणा न केल्यास त्यांच्यावर कठोर दंडात्मक कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मुदतीपूर्वी मालमत्ताकर भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन देखील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीत एकूण मालमत्तांची संख्या ९ लाख ५५ हजार ३८ इतकी आहे. त्यापैकी ५०० चौरस फूट (४६.४५ चौरस मीटर) व त्यापेक्षा कमी चटईक्षेत्र असणाऱया निवासी इमारती / निवासी सदनिकांना संपूर्ण मालमत्ता करातून सूट देण्यात आली आहे. या मालमत्तांची संख्या ३ लाख ५६ हजार ६५२ इतकी आहे. एकंदरीतच ५ लाख ९८ हजार ३८६ मालमत्ता कर आकारणी कक्षात येतात.

महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागामार्फत आर्थिक वर्ष २०२३-२०२४ ची सुधारित मालमत्ता कर देयके फेब्रुवारी २०२४ अखेरीस निर्गमित करण्यात आली. अधिनियमातील कायदेशीर तरतुदीनुसार, मालमत्ताधारकांना कर भरणा करण्यासाठी ९० दिवसांचा कालावधी देणे अनिवार्य आहे. त्यानुसार, सदर कर भरण्याचा अंतिम देय दिनांक २५ मे २०२४ हा आहे. उद्दिष्टपूर्तीसाठी करनिर्धारण व संकलन विभागाने मुंबई शहर आणि उपनगरांमधील मोठ्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. तसेच मागील थकबाकी वसुलीसाठी प्राधान्य देण्यात येत आहे. त्यानंतर अनेक मालमत्ताधारकांनी देय दिनांक २५ मे २०२४ पूर्वी कर भरण्याचे आश्वासित केले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाच्या वतीने वर्ष २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे उद्दिष्टाइतके मालमत्ता कर संकलित करण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न अद्यापदेखील सुरूच आहे. करनिर्धारण व संकलन विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी त्या दृष्टीने परिश्रम घेत आहेत. एप्रिल आणि मे २०२४ मध्ये संकलित होणारा मालमत्ताकर हा सन २०२३ - २४ या आर्थिक वर्षातील उद्दिष्टांचाच भाग आहे. त्यानुसार, दिनांक २३ एप्रिल २०२४ पर्यंत ३ हजार ५६९ कोटी रूपयांचा मालमत्ताकर संकलित झाला आहे. म्हणजेच निश्चित केलेले ४ हजार ५०० कोटी रूपयांच्या तुलनेत आतापर्यंत ७९ टक्के कर संकलन झाले आहे. देय दिनांकास अद्याप एक महिन्याचा कालावधी असल्याने १०० टक्के उद्दिष्ट गाठण्यात यश येईल, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने नमूद करण्यात येत आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ताधारकांना दिलेल्या मुदतीत करभरणा करता यावा, यासाठी कर निर्धारण व संकलन विभागाच्या वतीने वेळोवेळी व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. तथापि, अद्यापही करभरणा न केलेल्या मालमत्ताधारकांनी वेळीच कर जमा करुन दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

दिनांक, २४ एप्रिल २०२४ रोजी कर भरण्यासाठी पाठपुरावा केलेल्या ‘टॉप टेन’ मालमत्ताधारकांची यादी-

१) बॉम्बे ऑक्सिजन लिमिटेड - (टी विभाग) - ६८ कोटी ८८ लाख १ हजार ७७८ रुपये (चार मालमत्ता)

२) अॅरिस्टो शेल्टर प्रा. लि. (एम पूर्व विभाग) – २० कोटी ४१ लाख ६२ हजार ९ हजार ०७६ रुपये

३) मेसर्स फोरमोस्ट रिअॅलेटर्स प्रा लि.(एच पूर्व विभाग) – १५ कोटी ७५ लाख ७४ हजार २०७ रुपये

४) श्री साई गृप ऑफ कंपनीज (के पश्चिम विभाग) - १४ कोटी २२ लाख ८० हजार ८७४ रुपये

५) गौरव इन्वेस्टमेंट (जी दक्षिण विभाग) – १४ कोटी १६ लाख ३१ हजार ४८९ रुपये

६) मेसर्स पुरी कन्स्ट्रक्शन लि. (ए विभाग) – १३ कोटी ८३ लाख ९१ हजार ७४४ रुपये

७) स्नेहयोगी सहकारी गृहनिर्माण संस्था (एच पश्चिम विभाग) – १३ कोटी ७२ लाख ८२ हजार ०९९ रुपये

८) सुमेर कॉर्पोरेशन (एल विभाग) - १३ कोटी ०८ लाख ८३ हजार २२७ रुपये

९) लॅण्डमार्क डेव्हलपर्स (एफ दक्षिण विभाग) – १२ कोटी १२ लाख ७१ हजार ३०० रुपये

१०) श्री साई पवन सहकारी गृहनिर्माण संस्था (के पश्चिम विभाग) - ८ कोटी ७३ लाख ३३ हजार १११ रुपये

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande