शासकीय रुग्णालयात दाखल रुग्णाने घेतलेल्या विषाचा प्रकार शोधणारी सुविधाच नाही
अमरावती, 24 एप्रिल, (हिं.स.) राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये मोठ्या सं
शासकीय रुग्णालयात दाखल रुग्णाने घेतलेल्या विषाचा प्रकार शोधणारी सुविधाच नाही


अमरावती, 24 एप्रिल, (हिं.स.) राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये मोठ्या संख्येने विषबाधेचे रुग्ण उपचाराला येतात. परंतु, एकाही रुग्णालयात या विषाचा प्रकार शोधणारी ‘टॉक्लिकोलॉजिकल स्क्रिनिंग’ तपासणी उपलब्ध नाही. त्यामुळे डॉक्टरांना उपचारात अडचणी येतात. ही तपासणी उपलब्ध झाल्यास विषबाधेच्या मृत्यूचे प्रमाण कमी होणे शक्य आहे

राज्यात कौटुंबिक कारणांसह इतरही कारणांनी विविध विष प्राशन करून होणाऱ्या आत्महत्यांची संख्या मोठी आहे. या रुग्णांना अत्यवस्थ अवस्थेत शासकीय रुग्णालयात हलवले जाते. नागपुरातील मेडिकल रुग्णालयात रोज सुमारे या पद्धतीचे विविध विष प्राशन केलेले २ ते ३ रुग्ण उपचाराला येतात. मेयो रुग्णालयासह राज्यातील इतरही रुग्णालयात ही स्थिती आहे. तज्ज्ञ डॉक्टरला या रुग्णाने नेमके कोणते विष घेतले हे वेळीच कळल्यास उपचाराचे अचूक व्यवस्थापन करण्यास मदत होते. त्यानुसार रुग्णाच्या औषधांचा प्रकार व मात्रा ठरवता येते. परंतु, राज्यातील नागपूर, मुंबईसह इतर एकाही शासकीय रुग्णालयात या पद्धतच्या रुग्णाने सेवन केलेल्या विषाचा अचूक प्रकार शोधणारी ‘टॉक्सिकोलॉजिकल स्क्रिनिंग’ तपासणीच उपलब्ध नाही. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टर निवडक तपासणीच्या संशोधनासह अनुभवाच्या जोरावर उपचार करतात.

प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यलयातील न्यायवैद्यकशास्त्र विभागात एमएससी न्यायवैद्यकशास्त्र विषयाची तज्ज्ञांचे मनुष्यबळ व तंत्रज्ञ उपलब्ध करून ही तपासणी शक्य आहे. त्यामुळे विषबाधेच्या मृत्यूचे प्रमाण कमी करता येते. परंतु शासन लक्ष देत नसल्याने ही तपासणीच उपलब्ध होत नाही. त्यामुळे राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत या तपासण्या केव्हा उपलब्ध होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande