रेवदंडा येथे कोळी महासंघाचा भव्य जाहीर मेळावा पार
अलिबाग, 24 एप्रिल (हिं.स.) माझा मच्छीमार बांधव दर्याच्या तुफानाला... येणार्या संकटांना सामोरे जावून
रेवदंडा येथे कोळी महासंघाचा भव्य जाहीर मेळावा पार


अलिबाग, 24 एप्रिल (हिं.स.) माझा मच्छीमार बांधव दर्याच्या तुफानाला... येणार्या संकटांना सामोरे जावून पुन्हा त्याच ताकदीने उभा राहतो. सर्वाधिक चलन माझ्या याच मच्छीमार बांधवांकडून मच्छीमारी व्यवसायातून देशाला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे नेतृत्व करत स्वराज्याचे रक्षण याच कष्टकरी समाजाने केले त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांनी आज रेवदंडा येथील कोळी समाज महासंघाच्या मेळाव्यात कृतज्ञता व्यक्त केली.

माझ्या मच्छीमार बांधवांचा डिझेलचा परतावा यापुढे कधी थकीत राहणार नाही असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला असल्याचे सुनिल तटकरे यांनी सांगितले.

नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतर आणि मी केंद्रात खासदार म्हणून गेल्यानंतर केंद्रसरकारच्या माध्यमातून अनेक योजना मच्छीमार बांधवांच्या विकासासाठी राबवल्या जातील असा शब्दही सुनिल तटकरे यांनी दिला.

अलिबाग मतदारसंघासाठी जयंत पाटील यांनी जितका निधी आणला नाही त्यापेक्षा तिप्पट निधी आमदार महेंद्र दळवी यांनी अलिबाग मतदारसंघात आणल्याचेही सुनिल तटकरे यावेळी म्हणाले.

जयंत पाटील कालच शरद पवारसाहेबांना घेऊन मोर्बा या गावी आले होते परंतु त्या सभेला जिल्हयातील लोक आणूनही गर्दी झाली नाही इतकी गर्दी फक्त रेवदंडा मच्छीमार, कोळी बांधवांनी केली असल्याचा टोला सुनिल तटकरे यांनी लगावला.

जयंत पाटील तुम्ही नितीमत्ता, राजकारण आणि अक्कल आम्हाला शिकवू नका असे खडेबोल सुनावतानाच स्वतः चे आत्मपरीक्षण करा... तुमचा बालेकिल्ला म्हणता मग तुम्ही पिछाडीवर का गेलात यावर विचार न करता सुनिल तटकरे यांच्यावर टिका का करता असा सवालही सुनिल तटकरे यांनी केला.

या मतदारसंघात ४ जूनला घड्याळयाचा गजर ऐकायला मिळेल आणि विधानसभेला महेंद्र दळवी यांच्या धनुष्यबाणावर सर्वाधिक मताधिक्य असेल असे सांगतानाच यावेळी पहिल्यांदा घड्याळ या चिन्हासमोरील बटण तुम्हाला दाबायचे आहे. त्यामुळे उद्याच्या भविष्यात या भागाचे चित्र बदललेले दिसेल असा विश्वास सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

रायगड लोकसभा मतदारसंघातील जनमानसात सुनिल तटकरे यांचे स्थान अढळ आहे. त्यामुळे कुणीही कितीही प्रयत्न केला तरी ते निवडून येणारच असा शब्द आमदार महेंद्र दळवी यांनी दिला.

माझा कोळी आणि आगरी बांधव तटकरेसाहेबांच्या पाठीशी उभा राहणार असून त्याचे मतपेटीतून प्रत्यंतर दिसेल असेही महेंद्र दळवी यांनी सांगितले.

आपला समाज दुर्लक्षित राहिला आहे त्यांना न्याय देण्याची भूमिका घेत माझ्या मतदारसंघातील कोळीवाडयात जेटी आणल्या आहेत. संपूर्ण कोळीवाडयाचा विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याचे स्पष्ट केले.

नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी सुनिल तटकरे यांना निवडून द्यायचे आहे. एक अनुभवी आणि सुशिक्षित उमेदवार मिळाला आहे त्यांना केंद्रात पाठवुया. रायगडचा कोळी समाज प्रामाणिकपणे पाठीशी उभा राहिल असा शब्द आमदार रमेश पाटील यांनी यावेळी दिला.

एलईडी आणि पर्सनेट मच्छीमारीमुळे आमच्या कोळी बांधवांवर अन्याय होत आहे. याकडे आमदार रमेश पाटील यांनी लक्ष वेधले.

महायुतीच्यावतीने कोळी समाज महासंघाचा भव्य मेळावा रेवदंडा शहरात मोठ्या उत्साहात पार पडला. मेळाव्याच्या अगोदर भव्य रॅलीने कोळी बांधवांनी सुनिल तटकरे यांचे स्वागत केले.

या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे, आमदार महेंद्र दळवी, कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेश पाटील, कोळी समाजाचे कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी, युवा नेते चेतन पाटील, सरपंच प्रफुल मोरे, देवानंद भोईर आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande