मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाची जोडणी यशस्वी
मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाने गाठला ऐतिहासिक टप्पा भरती-ओहोटीचा वापर करून तुळई टाकून दोन मार्गांना स
तुळई जोडणी


तुळई जोडणी


मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाने गाठला ऐतिहासिक टप्पा

भरती-ओहोटीचा वापर करून तुळई टाकून दोन मार्गांना सांधणारा देशातील पहिलाच प्रयोग

बीएमसी प्रशासक भूषण गगराणी यांनी केले मुंबई किनारी रस्ता पथकाचे कौतुक

मुंबई, २६ एप्रिल (हिं.स.) : बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाने आज (२६ एप्रिल) पहाटे ३ वाजून २५ मिनिटांनी मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाला सांधणारी पहिली महाकाय तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) यशस्वीपणे स्थापन केली.

खुल्या समुद्रात भरती-ओहोटीचा सुयोग्य वापर करून तुळईद्वारे या दोन मार्गांना जोडण्याचे शिवधनुष्य बृहन्मुंबई महानगरपालिकेने लिलया पेलले. भारतातील हा पहिलाच प्रयोग यशस्वी ठरल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

पहाटे २ वाजेपासून सुरू झालेली ही मोहीम पहाटे ३ वाजून २५ मिनिटांनी यशस्वीपणे पार पडली. या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उपआयुक्त (विशेष अभियांत्रिकी) श्री. चक्रधर कांडलकर, प्रमुख अभियंता (मुंबई किनारी रस्ता प्रकल्प) श्री. गिरीश निकम, ‘एचसीसी’चे उपाध्यक्ष श्री. अर्जुन धवन, मोहिमेचे प्रमुख श्री. संतोष राय आदींसह अभियंते, अधिकारी उपस्थित होते. यावेळी आयुक्त श्री. गगराणी यांनी मुंबई किनारी रस्ता प्रकल्प टीमचे अभिनंदन केले.

एकूण १०.५८ किलोमीटर लांब असलेल्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील अतिशय आव्हानात्मक टप्पा म्हणजे मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाची सांधणी. त्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने अतिशय नियोजनबद्ध तयार केली. या दोन्ही टोकांना सांधणारी पहिली तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) बुधवार, दिनांक २४ एप्रिल रोजी दुपारी १२.३० मिनिटांनी माझगाव डॉक येथून मार्गस्थ झाली. त्यानंतर गुरुवार, दिनांक २५ एप्रिल रोजी पहाटे चार वाजता वांद्रे-वरळी सागरी सेतू जवळ पोहोचली.

संयम आणि कौशल्य पणाला लावणारे १ तास २५ मिनिटे

प्रवाहकीय हवामानानुसार अंदाज घेवून पहाटे २ वाजेपासून गर्डर स्थापनेची कार्यवाही सुरू करण्यात आली. त्यानंतर बार्जच्या मदतीने टप्प्याटप्प्याने तुळई मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाच्या मधोमध आणली. सागरी लाटांचा आणि वाऱ्याच्या वेगाचा अंदाज घेत अभियंत्यांनी कौशल्य पणाला लावत सुयोग्य स्थितीत तळईला स्थिर केले.

मुंबई किनारी रस्त्याच्या कडेला दोन आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाच्या कडेला दोन असे चार मेटींग युनिट तयार करण्यात आले आहेत. त्या मेटींग युनिटमध्ये तुळईचे चारही कोपऱ्यांना असलेले पांढऱ्या रंगाचे मेटींग कोन ठिक ३ वाजून २५ मिनिटांनी अचूकपणे बसविण्यात आले. चारही मेटींग कोन आणि मेटींग युनिटची सांगड बसताच उपस्थित अधिकारी, अभियंते आणि कामगारांनी 'हिप हिप हुर्रे' म्हणत आणि टाळ्यांचा गजरात मोहीम फत्ते झाल्याचा आनंद व्यक्त केला. त्यानंतर तुळई खाली असलेला रिकामा तराफा बाजूला करण्यात आला.

तुळईचा अंबाला ते मुंबई प्रवास

सदर तुळई ही वरळीकडून नरिमन पाईंट दिशेला जाणाऱ्या मार्गावर स्थापन करण्यात आली. ही तुळई दोन हजार मेट्रीक टन वजनाची असून, १३६ मीटर लांब आणि १८ ते २१ मीटर रुंद आहे. अंबाला (हरियाणा) येथे या तुळईचे छोटे छोटे सुटे भाग तयार करण्यात आले आहेत. तेथून तब्बल ५०० ट्रेलरच्या मदतीने हे सुटे भाग दाखल आले. सुटे भाग एकत्र जोडून नवी मुंबईतील न्हावा बंदरातून तराफाच्या मदतीने ही तुळई वरळी येथे आणली.

पुढील टप्प्यात ही कामे होणार

मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील वरळीकडील बाजू आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाची मुंबई किनारी रस्त्याला मिळणारी बाजू येथे प्रत्येकी दोन मेटींग कोन आणि दोन मेटींग युनिट बसविण्यात आले आहेत. या मेटींग कोन आणि युनिटची योग्य सांगड बसविण्यात आली आहे. हे मेटींग युनिट २ मीटर व्यास आणि मेटींग कोन १.८ मीटर व्यासाचे आहेत. यानंतर मेटींग कोन आणि युनिट असलेल्या चारही कोपऱ्यांवर जॅक बसविण्यात येतील. तसेच जॅक कार्यान्वित केल्यानंतर मेटींग कोन आणि युनिट काढून घेण्यात येणार आहेत. पुढच्या तांत्रिक प्रक्रियेत बेअरिंगचा वापर करून त्यावर तुळई स्थिरावणार आहे. त्यानंतर जॅकदेखील काढून घेण्यात येणार आहेत.

तुळईवर होणार सिमेंट क्राँक्रिटीकरण

मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू दरम्यान स्थापन करण्यात आलेल्या तुळईवर पुढील टप्प्यात सिमेंट क्राँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या तुळईला गंज चढू नये यासाठी सी-५ या जपानी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. तसेच अतिशय प्रगत वेल्डिंग तंत्रज्ञानाद्वारे तुळईचे सुटे भाग एकमेकांना जोडण्यात आले आहेत.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande