भाजपकडून मुंबई उत्तर मध्यसाठी उज्ज्वल निकम यांना उमेदवारी
- निकम विरुद्ध वर्षा गायकवाड होणार लढत
उज्ज्वल निकम 


- निकम विरुद्ध वर्षा गायकवाड होणार लढत

 
मुंबई, 27 एप्रिल (हिं.स.) - मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातील भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांचे तिकीट कापले असून त्यांच्या जागी भाजपने प्रख्यात वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. उत्तर मध्य मुंबईच्या जागेसाठी उज्ज्वल निकम आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, माधुरी दीक्षितने निवडणूक लढण्यास नकार दिला. त्यानंतर आता उज्ज्वल निकम यांना मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून भाजपनं उमेदवारी जाहिर केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज, शनिवारी भाजपच्या केंद्रीय कार्यालयाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी १५ वी यादी जारी केली. त्यात उज्ज्वल निकम यांचे नाव आहे.

महाविकास आघाडीकडून उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडण्यात आला. त्यानंतर या मतदारसंघातून नुकतीच मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात आता महायुतीचे उज्ज्वल निकम यांच्या विरोधात मविआच्या वर्षा गायकवाड यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे.

कोण आहेत उज्ज्वल निकम

२६/११ मुंबई हल्ल्यामध्ये उज्ज्वल निकम यांनी विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिलं होतं. यामधील एकमेव जिवंत हाती आलेला दहशतवादी अजमल कसाबला फाशीपर्यंत पोहोचवण्यात त्यांची मोठी भूमिका होती. निकम यांनी त्याआधी अनेक महत्वाच्या खटल्यांमध्ये सरकारी वकील म्हणून काम केलं आहे. त्यामुळं महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला ते चांगले परिचित आहेत. देशातील एक निष्णांत वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची ख्याती आहे.

मागील तीन दशकांहून अधिक काळ ते वकिली क्षेत्रात कार्यरत आहेत. निकम हे बीएससी आणि एलएलबी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. निकम यांनी आपल्या कारकिर्दीत २६/११ मुंबई हल्ला खटल्याव्यतिरिक्त १९९१ कल्याण रेल्वे बाॅम्बस्फोट खटला, १९९३ मुंबई साखळी बाॅम्बस्फोट खटला, २००३ गेट वे आॅफ इंडिया आणि झवेरी बाजार बाॅम्बस्फोट खटला आदी महत्वपूर्ण खटले लढले आहेत.

२०१६ मध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. २०११ मध्ये त्यांना तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते पुणे विद्यापीठाची मानद डाॅक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे.

पूनम महाजन यांच्यासह मुंबईतील तीन खासदारांचा पत्ता कट

पूनम महाजन यांच्यासह भाजपनं मुंबईतील तीन विद्यमान खासदारांचा पत्ता कट केला आहे. भाजपनं मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून पूनम महाजन यांचं तिकीट कापत उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. याआधीही भाजपनं मुंबईतील दोन विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं आहे. भाजपने उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी आणि ईशान्य मुंबईतील खासदार मनोज कोटक यांचं तिकीट आधीच कापलं आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande