प्रचारगीतामधील आक्षेपार्ह शब्दाबाबतचा ठाकरे गटाचा फेरविचार अर्ज फेटाळला
मुंबई, 27 एप्रिल (हिं.स.) - प्रचारगीतामधील ‘जय भवानी’ आणि ‘हिंदू’ शब्दांवरील आक्षेपाबाबत शिवसेना उद्
उद्धव ठाकरे


मुंबई, 27 एप्रिल (हिं.स.) - प्रचारगीतामधील ‘जय भवानी’ आणि ‘हिंदू’ शब्दांवरील आक्षेपाबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा फेरविचार अर्ज निवडणूक आयोगाने फेटाळून लावला आहे. आयोगाने यापूर्वी घेतलेला निर्णय नियमानुसार असून आपण आक्षेपार्ह शब्द वगळण्याबाबत विचार करावा, अशी सूचना आयोगाने ठाकरे गटाला केली आहे. आता यावर त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

ठाकरे गटाच्या प्रचारगीतातील शब्दांवर आक्षेप घेत आयोगाच्या राज्यस्तरीय माध्यम प्रमाणीकरण समितीने प्रमाणपत्र नाकारले. सदर निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करीत ‘जय भवानी’ आणि ‘हिंदू’ शब्द वगळण्यास ठाकरे यांनी स्पष्ट नकार देत आयोगाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाने जी काही कारवाई करायची आहे ती करावी. मात्र निवडणूक आयोगाने आधी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर कारवाई करावी, असेही उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते. दरम्यान या दोन्ही शब्दांबाबत फेरविचार करण्याची विनंतीही आयोगाला करण्यात आली होती. मात्र राज्यस्तरीय माध्यम प्रमाणीकरण समितीने हा अर्ज शुक्रवारी फेटाळून लावला.

नियमानुसार मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा किंवा कोणत्याही धार्मिक प्रार्थनास्थळाचा तसेच धार्मिक वाक्ये, चिन्ह, घोषवाक्य यांचा भित्तीपत्र, व्हिडीओ ग्राफिक, गाण्यात वापर करण्यास मनाई आहे.

ठाकरे गटाप्रमाणेच अन्य ३९ प्रकरणांत आयोगाने आक्षेप घेतले आहेत. त्यापैकी १५ प्रकरणी संबंधित राजकीय पक्षांनी सुधारणा केल्या असून त्यांच्या प्रसिद्धी साहित्याला मान्यता देण्यात आली आहे. इतरांना मान्यता प्रमाणपत्र मिळालेले नाही.

काय आहे प्रकरण

ठाकरे गटाने आपल्या निवडणूक चिन्ह मशालवर आधारित प्रचार गीत १७ एप्रिल २०२४ रोजी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत लाँच करण्यात आले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने २४ एप्रिल रोजी एक सूचना जारी केली. यामध्ये विविध कारणांसाठी काही पक्षांना ३९ नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. यामध्ये ठाकरे गटाच्या प्रचार गीतासाठी देखील नोटीस बजावण्यात आली. यातील हिंदू आणि जय भवानी शब्द वगळा असे सांगण्यात आले आहे. मात्र ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाने बजावलेल्या नोटीसमधील आक्षेपावर फेरविचार करावा, असा अर्ज दाखल करण्यात आला. त्यावर तो अर्ज निवडणूक आयोगाने फेटाळला आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande