केंद्र सरकारकडून ९९,१५० मेट्रीक टन कांदा निर्यातीस परवानगी
नवी दिल्ली, 27 एप्रिल (हिं.स.) - केंद्र सरकारने ९९,१५० मेट्रीक टन कांदा निर्यातीस परवानगी दिली आहे.
कांदा 


नवी दिल्ली, 27 एप्रिल (हिं.स.) - केंद्र सरकारने ९९,१५० मेट्रीक टन कांदा निर्यातीस परवानगी दिली आहे. यामुळे कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामध्ये बांगलादेश, यूएई, भूतान, बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंका या सहा देशांमध्ये निर्यात करण्यास परवानगी दिली आहे.

एकीकडे महाराष्ट्रातील लाल कांद्याला निर्यात बंदी असताना दुसरीकडे गुजरातच्या पांढऱ्या कांद्याची निर्यात केंद्र सरकारने खुली केली होती. त्यानंतर विरोधकांनी या मुद्यावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. त्या पार्श्वभूमीवर सरकारने आज (शनिवारी) ही परवानगी दिली आहे. दरम्यान राष्ट्रीय बाजारपेठेत कांद्याची वाढलेली मागणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. कांदा निर्यात सुलभ होण्यासाठी नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड (NCEL) ही एजन्सी नियुक्त केली आहे.

एनसीईएल स्पर्धात्मक किमतीत ई-प्लॅटफॉर्मद्वारे देशांतर्गत उत्पादकांकडून कांद्याची खरेदी करण्यात येणार आहे. १०० टक्के आगाऊ पेमेंट देऊन कांद्याचा पुरवठा गंतव्य देशांच्या नामांकित एजन्सी किंवा एजन्सींना वाटाघाटीनुसार दराने केला जाईल. याव्यतिरिक्त, सरकारने दोन हजार मेट्रिक टन पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला आधी परवानगी दिली आहे.

प्रतिक्रिया

निर्णय चांगला, पण हे पुरेसे नाही - राजू शेट्टी

कांदा निर्यातीचा केंद्र सरकारचा निर्णय नक्कीच चांगला आहे. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल. सरकारने आधी गुजरातमधील पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीस परवानगी दिली होती. या निर्णयावर टीका होऊ लागल्यानंतर व लोकसभा निवडणुकी डोळ्यासमोर ठेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे. सरकारने ९९ हजार १५० मेट्रीक टन कांदा निर्यातीस परवानगी दिली असली तरी हे पुरेसे नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले.

निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन घेतलेला निर्णय - अजित नवले

शेतकरी नेते अजित नवले म्हणाले की, महाराष्ट्रात सर्वाधिक कांद्याचे उत्पादन केलं जातं. ज्यावेळी निर्यात बंदी करण्यात आली. ही निर्यात बंदी उठवण्याची मागणी केल्यानंतर सरकारने त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. मात्र आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गुजरातच्या कांद्याला निर्यातीस परवानगी दिली गेली. त्यानंतर सरकारवर टीका होऊ लागल्यानंतर देशभरातील शेतकऱ्यांना कांदा निर्यातीस परवानगी दिली गेली. महाराष्ट्रातील निवडणुकांवर परिणाम होईल, हे डोळ्यासमोर ठेऊन निर्णय घेण्यात आल्याचे अजित नवले म्हणाले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande