रायगडमधून मविआच्या रमेश कीर यांना सर्वात जास्त मताधिक्य द्या - पटोले
पनवेल, 18 जून, (हिं.स.) भारतीय जनता पक्षाच्या सरकारने महाराष्ट्रातील लोकशाही व्यवस्थेला, छत्रपती शिव
पनवेल


पनवेल, 18 जून, (हिं.स.) भारतीय जनता पक्षाच्या सरकारने महाराष्ट्रातील लोकशाही व्यवस्थेला, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला बरबाद करण्याचे पाप केले आहे. सत्तेच्या व पैशाच्या जोरावर कोणालाही विकत घेऊ अशी प्रवृत्ती राज्यात बळवली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या या निवडणुकीत कोकणातील मतदारांना विकत घेऊ पाहणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचारासाठी पनवेलमध्ये आयोजित करण्यात मेळाव्यात नाना पटोले बोलत होते. ते पुढे म्हणाले की, भाजपाच्या राजवटीत महाराष्ट्र हे बेरोजगारांचे राज्य झाले आहे. १७ हजार पोलीस पदांसाठी १७ लाख अर्ज आले हे भिषण बेरोजगारीचे चित्र आहे पण ही पोलीस भरती तरी सुरुळीत पार पडेल काय याची शंका वाटते. कारण भाजपा सरकारमध्ये अशा भरती राबवल्या जातात व नंतर पेपरफुटी होते व परिक्षा रद्द होते. राज्यातील उद्योग मोठ्या प्रमाणात बाहेर गेले आहेत, महाराष्ट्राचे सर्व नियोजनच गायब झाले आहे. भाजपा सरकारने १० वर्षात १० पिढ्या बरबाद केल्या आहेत, वयोमर्यादा संपली की संधी जाते, ग्रामीण भागात तर परिस्थिती अत्यंत भयानक आहे. महाराष्ट्राची वाताहत करण्याऱ्या व्यवस्थेला धडा शिकवण्याची संधी तुमच्या हातात आहेत. नागपूर व अमरावती विधान परिषद निवडणुकीत भाजपाचा पराभव करुन इतिहास निर्माण केला ते काम पदवीधरांनीच केले असेच काम आता कोकण पदवीधरच्या निवडणुकीत करा असेही नाना पटोले म्हणाले.

या मेळाव्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, शेकापचे आमदार जयंत पाटील, शिवसेनेचे उपनेते विजय कदम, माजी आमदार बळीराम पाटील, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेश शर्मा, अभय छाजेड यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व पदवीधर मोठ्या संख्याने उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande