अमेरिकेतही बदलाचे वारे, निवडणूकीतून बायडेन यांची माघार
* भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना पाठिंबा वॉशिंग्टन,२२ जुलै (हिं.स.) : अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीपूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून विद्यमान अध्यक्ष जो बायडेन यांनी
जो बायडेन


* भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना पाठिंबा

वॉशिंग्टन,२२ जुलै (हिं.स.) : अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीपूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून विद्यमान अध्यक्ष जो बायडेन यांनी माघार घेतली आहे. तसेच, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज देखील मागे घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी पत्र लिहून निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. तसेच विद्यमान उपाध्यक्ष तथा भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना आपला पाठिंबा घोषित केला आहे.

अमेरिकचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील लाईव्ह डिबेटमध्ये बायडेन निष्प्रभ ठरल्यापासूनच, जाणकारांना अंदाज होता की बायडेन निवडणूक रिंगणातून माघार घेतील. डिबेटमध्ये ट्रम्प यांच्या प्रभावी प्रदर्शनामुळे बायडेनच्या माघारीची चर्चा वाढली होती. या राजकीय वातावरणात ट्रम्प यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला, ज्यामुळे त्यांच्या प्रति सहानुभूतीची लाट निर्माण झाली. या घटनेने ट्रम्प यांना अधिक समर्थन मिळाल्याने, त्यांची विजयाची शक्यता वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली.

८१ वर्षीय बायडेन यांच्या मानसिक आरोग्याबाबतही त्यांच्या रिपब्लिकन विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले होते, ज्यामुळे त्यांच्या क्षमतांवर शंका निर्माण झाली. या सर्व पार्श्वभूमीवर, बायडेन यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा 'एक्स'वर केली आहे. दरम्यान बायडेन यांनी आपला पाठींबा भारतीय वंशाच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना दिल्याचे जाहीर केले. कमला हॅरिस या उपाध्यक्ष पदावर कार्यरत असलेल्या पहिल्या भारतीय-अमेरिकन महिला आहेत आणि त्यांची उमेदवारी आता अधिकृत झाल्यामुळे आगामी निवडणुकीत ट्रम्प यांच्याशी त्यांची थेट लढत होईल.

बायडेन यांच्या माघारीने अमेरिकन राजकारणात मोठा बदल घडवला आहे. त्यांच्या निर्णयामुळे डेमोक्रॅटिक पक्षाच्या रणनीतीत मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.

काल (रविवार) रात्री उशीरा जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. अमेरिका आणि माझा पक्ष यांच्या हिताच्या दृष्टीने मी हा निर्णय घेतला आहे, असे बायडेन यांनी यांनी सांगितले. खरे तर डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरच्या डिबेटदरम्यानही बायडेन यांना त्यांची भूमिका ठोसपणे मांडता आली नव्हती. काही दिवसांपूर्वी बायडेन यांना करोना संसर्ग झाला होता. या संसर्गामुळे श्वसनाचा त्रासही सुरू झाला होता. गेल्या काही महिन्यात सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांना विस्मरण झाल्याचेही दिसले होते.

जो बायडेन यांनी त्यांचा निर्णय जाहीर करताच डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमांशी बोलताना या संदर्भात प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, जो बायडेन यांनी निवडणुकीतून माघार घेतली, ते चांगलेच झाले. खरे तर ते अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात वाईट राष्ट्राध्यक्ष होते. ते राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी योग्य व्यक्ती नव्हते. मागच्या निवडणुकीत खोटे बोलून आणि खोटा प्रचार करून ते राष्ट्राध्यक्ष झाले, अशी टीका डोनाल्ड ट्रम्प यांनी केली.

पुढे बोलताना त्यांनी कमला हॅरिस यांच्या उमेदवारीबाबतही भाष्य केले. जर डेमोक्रॅट्स पक्षाने कमला हॅरिस यांना उमेदवारी दिली, तर बायडेन यांच्या तुलनेत कमला हॅरिस यांचा पराभव करणे सोपेे आहे, असे ते म्हणाले. तसेच आगामी निवडणुकीत आमच्या पक्षाचा विजय नक्कीच विजय होईल, असा विश्वासही डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला.

हिंदुस्थान समाचार / Shuddhodana Mangorao / सुधांशू जोशी


 rajesh pande