ढाका, 31 ऑगस्ट (हिं.स.)।बांगलादेशने भारताच्या निर्यात बंदीनंतर भारत-बांगलादेश सीमेवर असलेली तीन भू-बंदरं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मुहम्मद युनुस सरकारनुसार, भारतासोबतचा व्यापार कमी झाल्यामुळे अनावश्यक खर्च टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
भारताच्या निर्यात बंदीनंतर बांगलादेशने भारत-बांगलादेश सीमेवरील तीन भू-बंदरं बंद केली आहेत. बंद करण्यात आलेल्या बंदरांमध्ये निलफामारीमधील चिलाहाटी बंदर, चुआडांगामधील दौलतगंज बंदर, आणि रांगामाटीमधील तेगामुख बंदर यांचा समावेश आहे. यासोबतच हबिगंज जिल्ह्यातील बल्ला भू-बंदराचे कामकाजही स्थगित करण्यात आले आहे. बांगलादेशने बंद केलेली ही भू-बंदरं बऱ्याच काळापासून निष्क्रिय होती. ही बंदरं बंद करण्याचा निर्णय बांगलादेशचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनुस यांच्या कार्यालयात पार पडलेल्या सल्लागार परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीनंतर युनुस यांचे प्रेस सचिव शफीकुल आलम यांनी ही माहिती अधिकृतपणे जाहीर केली.
शफीकुल आलम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, बांगलादेशात अनेक भू-बंदरांना मान्यता देण्यात आलेली आहे, परंतु अपुरी पायाभूत सुविधा आणि घटत चाललेला व्यापार यामुळे ही बहुतांश बंदरं प्रभावी ठरत नाहीत.ते म्हणाले की, ही बंदरं कार्यरत ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करावी लागते आणि अनावश्यक खर्चही करावा लागतो, ज्यामुळे सरकारच्या आर्थिक संसाधनांवर ताण येतो.
शफीकुल आलम म्हणाले, “बांगलादेशात इतर अनेक भू-बंदरांना मान्यता मिळालेली आहे, पण त्यापैकी बहुतांश बंदरं प्रत्यक्षात निष्क्रिय आहेत. आवश्यक पायाभूत सुविधा किंवा व्यावसायिक हालचालींचा अभाव असल्यामुळे ही बंदरं कार्यान्वित ठेवण्यासाठी सरकारला अतिरिक्त निधी खर्च करावा लागतो. या ठिकाणी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी लागते आणि त्यामुळे करदात्यांचा पैसा खर्च होतो.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode