जकार्ता, 31 ऑगस्ट (हिं.स.)।इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबिआंतो यांनी शनिवारी(दि.३०) चीनची प्रस्तावित यात्रा रद्द केली. त्यांना ही यात्रा रद्द करावी लागली कारण राजधानी जकार्ताच्या बाहेरील भागात गेले काही दिवस सुरू असलेले आंदोलन आणखी उग्र झाले. या आंदोलनात अनेक प्रादेशिक संसद भवनांना आग लावण्यात आली. प्रबोवो यांना ३ सप्टेंबर रोजी चीनमध्ये ‘विजय दिवस’ मिरवणुकीत सहभागी होणार होते, जी जपानच्या औपचारिक शरणागतीनंतर दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीच्या ८०व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आली होती.
मीडिया रिपोर्टनुसार, सुमारे वर्षभरापूर्वी स्थापन झालेल्या प्रबोवो सरकारसाठी हे पहिले मोठे आव्हान मानले जात आहे. हे आंदोलन या आठवड्यात जकार्तामध्ये खासदारांच्या पगाराविरोधात सुरू झाले होते, आणि त्यानंतर पोलिस वाहनाने एका दुचाकीस्वाराला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला, त्यामुळे परिस्थिती अधिकच चिघळली.
राष्ट्रपतींचे प्रवक्ते प्रसेत्यो हादी यांनी एका निवेदनात सांगितले, “राष्ट्रपती देशातील परिस्थितीवर थेट लक्ष ठेवू इच्छितात आणि सर्वोत्तम तोडगा शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.” त्यांनी सांगितले की, ह्याच कारणामुळे राष्ट्रपतींनी चीन सरकारची माफी मागितली आहे की, ते आमंत्रणात सहभागी होऊ शकले नाहीत. प्रसेत्यो यांनी सांगितले की, यात्रा रद्द करण्यामागचे आणखी एक कारण म्हणजे सप्टेंबरमध्ये होणारा संयुक्त राष्ट्र महासभेचा अधिवेशन सत्र देखील आहे.
आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर, चीनच्या बाइटडान्सच्या मालकीच्या शॉर्ट-व्हिडिओ अॅप टिकटॉकने शनिवारी जाहीर केले की त्यांनी इंडोनेशियामध्ये आपले लाईव्ह प्रसारण काही दिवसांसाठी स्थगित केले आहे. याच आठवड्यात जकार्तामधील सरकारने मेटा प्लॅटफॉर्म्स इंक आणि टिकटॉक यांसारख्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मच्या प्रतिनिधींना तातडीने बोलावले आणि ऑनलाईन चुकीच्या माहितीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे कंटेंट मॉडरेशन वाढवण्याचे आदेश दिले. सरकारचे म्हणणे आहे की, अशा चुकीच्या माहितीमुळेच सरकारविरोधातील आंदोलनांना चिथावणी मिळाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode