अकोला, 25 जुलै, (हिं.स.) - मागील तीन दिवसात बुलढाणा जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनेत दोन चिमुकल्यांचे अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एकाचा खून करून त्याला उकिरड्यात पुरल्याचे उघडकीस आले आहे. तर, दुसरा 14 वर्षीय चिमुकला अजूनही बेपत्ता आहे.
बुलढाणा जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक आयर्नमॅन कृष्णप्रकाश हे वार्षिक पडताळणीच्या कामानिमित्ताने जिल्ह्यात तळ ठोकून असताना या दोन्ही घटना घडलेल्या आहेत हे विशेष..
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुकयातील अंबाशी गावातून दोन दिवसापूर्वी १० वर्षीय शेख अरहान शेख हारून चिमुकल्याचे अपहरण झाले होते. यामध्ये तपासाअंती त्याचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी युद्धपातळीवर चिमुकल्याचा शोध घेतला असता गावातील चिमुकला अरहानचा आतेभाऊ असलेल्या शेख अन्सार वर संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने अपहरण करून अरहान चां गळा आवळून खून केल्याची कबुली दिलीय. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचे मृतदेहाला उकिरड्यात पुरले असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी अरहानचा मृतदेह रात्रीच उकिरड्यातून काढून त्या मृतदेहाला ताब्यात घेतले. आरोपी शेख अन्सार शेख नसीर यांचेवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केलीय. मात्र यामुळे आंबाशी गावं परिसरात एकच खळबळ उडालीय.
हि घटना ताजी असतानांच शेगाव तालुक्यातून आणखी धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेगाव तालुक्यातील नागझरी येथील १४ वर्षीय मुलगा कालपासून बेपत्ता झाला आहे. कृष्णा राजेश्वर कराळे असे मुलाचे नाव असून मंगळवारी सकाळी १० वाजता तो शाळेत गेला होता. शाळा संपल्यावर देखील, भरपूर वेळ उलटून गेला. तरी कृष्णा घरी परतला नाही. यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी शोध घेतला. गावात, शाळा परिसरात खूप शोधूनही कृष्णा मिळाला नाही.
सीसीटीव्हीच्या आधारे तपास
कृष्णा कराळे हा शेगाव येथील एका विद्यालयात वर्ग आठवीमध्ये शिक्षण घेत आहे. त्याचे कुटुंबीय चिंतेत असून ठिकठिकाणी त्याचा शोध सुरू आहे. दरम्यान पोलिसांनी शहरातील विविध रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्ही द्वारे तपास सुरु केलेला असून एक मोटार दुचाकीस्वार सदर मुलाला आपल्या दुचाकीवर बसवून घेऊन जातांना दिसून येत आहे. विशेष म्हणजे दुचाकीस्वाराने आपल्या तोंडावर रुमाल बांधलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अल्पवयीन मुलांचे बेपत्ता होण्याच्या घटना वाढल्या. आपल्या मुलांवर देखरेख ठेवून, काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे असे आवाहनही पोलिसांनी केले होते.
अजूनही बेपता असलेल्या शेगाव तालुक्यातील नागझरी येथील कृष्णा राजेश्वर कराळे हा मुलगा कुणाला आढळून आल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांनी केले आहे.
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे / मेघा माने / हर्षदा गावकर