तेहरान, 31 जुलै (हिं.स.) : इराणच्या तेहरात शहरात वास्तव्याला असलेला हमास या दहशतवादी संघटनेच्या राजकीय शाखेचा म्होरक्या इस्माईल हानिया याचा आज, बुधवारी पहाटे झालेल्या एका हल्ल्यात मृत्यू झालाय. यात हानियासोबतच त्यांचे अंगरक्षकही ठार झालेत. इराणच्या लष्कराने म्हणजेच इराण रिव्होल्युशनरी गार्ड्सनेही याला दुजोरा दिला आहे.
यासंदर्भातील माहितीनुसार, तेहरानमधी निवासस्थानाला लक्ष्य करून बुधवारी पहाटे हवाई हल्ला करण्यात आला. हवाई हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाल्याचे हमासने म्हटले आहे. इराणच्या नव्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी सोहळ्यात इस्माईल हानिया सहभागी झाला होता. त्यांने इराणच्या सर्वोच्च नेत्याचीही भेट घेतली होती. इस्माईल हनिया यांच्या निधनाबद्दल इस्लामी गटाने शोक व्यक्त केला आहे. इराणच्या सरकारी टेलिव्हिजनवरील विश्लेषकांनी या हत्येसाठी इस्रायलला जबाबदार ठरवले आहे. गेल्या एप्रिल महिन्यामध्ये इस्रायली सुरक्षा दलांनी हानियाच्या 3 मुलांची हत्या केली होती. गाझा पट्टीत हवाई हल्ल्यात तिघेही ठार झाले. इस्त्रायली डिफेन्स फोर्सने (आयडीएफ) दावा केला होता की हानियाची तीन मुले अमीर, हाझेम आणि मोहम्मद हे दहशतवादी कारवायांमध्ये सामील होते.
हमासच्या दहशतवाद्यांनी 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलवर हवाई हल्ले केले होते. या हल्ल्यात सुमारे 1,200 लोक मारले गेले. या घटनेनंतर इस्रायलने हमासविरुद्ध युद्ध सुरू केले आहे. इस्रायलचे लष्कर गाझामध्ये हमासवर सातत्याने लष्करी कारवाई करत आहे. इस्माईल हानियाचा जन्म 1962 मध्ये गाझा पट्टीतील अल-शाती निर्वासित छावणीत झाला. 2006 ते 2007 या काळात त्यांनी पॅलेस्टाईन प्राधिकरणाचे पंतप्रधान म्हणून काम केले होते. 2017 मध्ये त्यांना खालेद मेशालच्या जागी हमास प्रमुख बनवण्यात आले होते. दरम्यान पहाटे इराणमध्ये झालेला हल्ल्यासंदर्भात इस्त्रायलकडून अधिकृत वक्तव्य पुढे आलेले नाही.
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी