कुडाळ पत्रकारांची तहसीलदारांसोबत विकासात्मक चर्चा
सिंधुदुर्ग, 6 जुलै (हिं.स.) : कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी आज कुडाळ तालुक्यातील पत्रकारांशी
कुडाळ येथील पत्रकारांशी चर्चा करताना कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे.  


सिंधुदुर्ग, 6 जुलै (हिं.स.) : कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी आज कुडाळ तालुक्यातील पत्रकारांशी विविध विषयांवर चर्चा केली. लोकांचे विविध प्रश्न, त्यांना येणाऱ्या अडचणी, प्रशासकीय कामकाज, लाडकी बहीणसह विविध योजना यावर यावेळी विस्तृत स्वरूपात चर्चा करण्यात आली.

कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी कुडाळ तालुक्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लोकोपयोगी कामे करण्यावर भर दिला आहे. शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मिळणारे दाखले त्यांना वेळेत मिळावेत यासाठी त्यांनी तीन ग्राम पंचायत स्तरावर दाखले शिबिरे आयोजित केली. त्याचा विद्यार्थ्यांना आणि पालकांना चांगला फायदा झाला. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी म्हणून केवायसीसाठी शिबीरे आयोजित करणे, त्यांच्या शेतापर्यंत जाणे, आजारी लाभार्थ्यांच्या घरी जाऊन त्याची केवायसी पूर्ण करणे अशी कामे तहसीलदार श्री. वसावे यांनी केली. सध्या तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या मार्गदर्शनासाठी त्यांनी तालुक्यात मंडळनिहाय शिबिरे आयोजित केली आहेत. त्याचा चांगला फायदा महिलांना होत आहे.

नेहमी लोकांना मध्यवर्ती ठेवून काम करणाऱ्या तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी आज कुडाळ तालुक्यातील पत्रकारांना आपल्या कार्यालयात चहासाठी निमंत्रित करून कुडाळ तालुक्यातील विविध विषयांवर चर्चा केली. लोकांचे प्रश्न समजून घेतले. सध्या मुख्यमंत्री लाडकी योजनेसाठी अर्ज भरणे सुरु आहे. हे अर्ज अंगणवाडी सेविकांकडून भरून घ्यावे असे आवाहन श्री. वसावे यांनी केले. या योजनेबाबत लोकांमध्ये अजून स्पष्टता आलेली नाही. जर एखादी महिला शासनाच्या अन्य योजनांचा रु. १५०० चा लाभ घेत असेल तर त्या महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही असे परिपत्रकात नमूद असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

सातबारा बाबत सुद्धा चर्चा झाली. डिजिटल सात बारा मध्ये बऱ्याचवेळा नावांचा घोळ होतो हि बाब पत्रकारांनी निदर्शनाला आणली. त्यावर बोलताना श्री. वसावे म्हणाले, हस्तलिखित सातबारावर नाव असते ते जर डिजिटल सात बारावर चुकले तर ते दुरुस्त करता येते. पण हस्तलिखित सातबारावर जर नाव चुकीचे असेल तर मात्र त्यासाठी १५५ अंतर्गत अपील करावे लागते असे श्री. वसावे यांनी सांगितले.

त्याच बरोबर रेशन कार्डवरील नवे कमी करणे, नोंदी, याबातची कामे प्राधान्याने हाती घेण्यात येणार असल्याचे तहसीलदार श्री. वसावे यांनी सांगितले. तसेच वारस तपास बाबत प्रलंबित नोंदी आहेत त्या त्या पूर्ण करून घेण्याबाबत तलाठ्यांना लवकरच आवश्यकता सूचना देण्यात येतील असे श्री. वसावे म्हणाले. पूरपरिस्थिती बाबत आपत्ती व्यवस्थापनाच्या मीटिंगमध्ये सार्वजनिक बांधकाम आणि संबंधित विभागांना सूचना केल्या होत्या. त्याचे त्यांनी पालन करणे आवश्यक आहे. जुन्या आंबेरी पुलावरून पावसात वाहतूक करणे धोकादायक आहे. रात्रीच्या वेळी तर हा धोका अधिक वाढतो. त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला तसे फलक लावणे गरजेचे आहे. तसेच लाईटची व्यवस्था देखील होणे आवश्यक आहे. तशा सूचना आपण सार्वजनिक बांधकाम विभागाला देऊ असे श्री. वसावे यांनी सांगितले.

कुडाळ शहराचा डीपी प्लॅन होणे आवश्यक आहे. जेणेकरून सांडपाण्याची समस्या कमी होईल. असे श्री. वसावे म्हणाले. विकासकामात सर्व प्रशासनामध्ये आणि विभागांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे, तरच शहराचा आणि गावाचा चांगल्या प्रकारे विकास होऊ शकतो असे तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी सांगितले.

यावेळी नायब तहसीलदार प्रतीक आढाव, नायब तहसीलदार संजय गवस, अव्वल कारकून नरेंद्र एडके तसेच पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर, तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष निलेश जोशी, रवी गावडे, प्रमोद म्हाडगूत, विलास कुडाळकर,पद्माकर वालावलकर, प्रसाद राणे, गुरु दळवी, रोहन नाईक, हरिश्चंद्र पालव आदी पत्रकार उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande