नाशिक , 12 सप्टेंबर (हिं.स.)।
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय, १५ वर्षांखालील मुलींच्या आमंत्रितांच्या साखळी क्रिकेट (इन्व्हिटेशन लीग ) स्पर्धेत , दुसऱ्या सामन्यात नाशिक जिल्हा संघाने लातूर जिल्हा संघावर २४९ धावांनी प्रचंड मोठा विजय मिळवला. धुळे येथे झालेल्या या ३५ षटकांच्या सामन्यात नाशिकच्या कार्तिकी गायकवाडने घणाघाती फलंदाजीने सामना गाजवला. सलामीला येऊन कार्तिकीने केवळ १०३ चेंडूत ३१ चौकारांसह नाबाद १७७ धावा फटकवल्या. तिला लक्ष्मी झोडगे नाबाद ६३ व गौरी आहिरेच्या ४४ धावांची साथ मिळाली . गोलंदाजीत मधुरा दायमा व आराध्या संगमनेरेने चमक दाखवली. नाशिकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली व ३५ षटकांत १ बाद ३३१ धावा केल्या. त्यानंतर लातूरला मधुरा दायमाने ४ व आराध्या संगमनेरेने ३ तर अनुष्का सोनवणेने २ बळी घेत २४.५ षटकांत ८२ धावांत गुंडाळले. त्यामुळे नाशिक जिल्हा संघाने लातूर जिल्हा संघावर २४९ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
---------------
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI