रत्नागिरी, 14 जानेवारी, (हिं. स.) : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाद्वारे राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळविण्यासाठी १४ जानेवारी ते २६ जानेवारी २०२५ या कालवधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.
क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ क्रीडामहर्षीकरिता जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांकरिता उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक / जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. या वर्षीच्या पुरस्कारासाठी राज्यातील क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू व साहसी उपक्रमात सहभागी झालेले खेळाडू/व्यक्ती यांच्याद्वारा ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
इच्छुकांनी विहित मुदतीत क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in संकेतस्थळावर स्क्रोलिंग लिंक (Scrolling Link) मध्ये उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर २६ जानेवारीला रात्री १२ वाजेपर्यंत फक्त ऑनलाइन अर्ज सादर करावेत.
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी