मुंबई, 14 जानेवारी (हिं.स.)।भारताला ऑस्ट्रेलियाकडून नुकताच पराभवाचा सामना करावा लागला.यामुळे कर्णधार, खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्यावर केवळ टीकाच झाली नाही, तर ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) रडारवरही आले आहेत. यांनतर, आता बीसीसीआय कठोर पावले उचलणार आहे. यानुसार, खेळाडूंच्या पत्नी संपूर्ण दौऱ्यावर त्यांच्यासोबत जाऊ शकणार नाहीत. त्यांना आपल्या पतीसोबत राहण्यासाठी केवळ काही दिवसच मिळतील, अशी महिती आता समोर आली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी बीसीसीआय अॅक्शन मोडवर आली आहे. टीम इंडियाच्या पराभवानंतर बीसीसीआयने मुंबईत एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीला मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा हेदेखील उपस्थित होते. या बैठकीनंतर, बोर्ड आता खेळाडू आणि प्रशिक्षक कर्मचाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार करत आहे. ज्यामध्ये क्रिकेटर्सच्या पत्नी संपूर्ण ४५ दिवसांच्या परदेश दौऱ्यादरम्यान त्यांच्यासोबत राहू शकणार नाही. खेळाडूंना त्यांच्या कुटुंबियांसोबत जास्तीत जास्त दोन आठवडे राहण्याची परवानगी असेल. संपूर्ण परदेश दौऱ्यांदरम्यान खेळाडूंचे कुटुंब सोबत असल्याने, खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होतो, यासंदर्भात विचार करण्यात आला. यामुळे, खेळाडूंच्या कुटुंबियांना परदेश दौऱ्यादरम्यान केवळ १४ दिवसांसाठी त्यांच्यासोबत राहण्याची परवानगी असेल. त्यामुळे पुन्हा एकदा २०१९ पूर्वी असलेले नियम लागू होणार आहेत.
नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये ४५ किंवा त्याहून अधिक दिवस चालणाऱ्या स्पर्धेत पत्नी किंवा कुटुंब केवळ १४ दिवस खेळाडूसोबत राहू शकतील. जर दौरा लहान असेल तर हा कालावधी सात दिवसांचा असेल. बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेतील १-३ पराभवाच्या वेळी अनेक क्रिकेटपटूंच्या पत्नी आणि कुटुंबीय संपूर्ण वेळ ऑस्ट्रेलियात होते. गेल्या काही वर्षांत काही खेळाडू संघाच्या बसने सोबत न जाता वेगळे प्रवास करत असल्याचे दिसून आले. आता याबाबतही कडक कारवाई करण्यात येणार आहे. सांघिक एकतेच्या दृष्टीने आता सर्व खेळाडू टीम बसनेच प्रवास करतील. तो कितीही मोठा खेळाडू असला तरी त्याला वेगळे जाऊ दिले जाणार नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode