नवी मुंबई, 12 सप्टेंबर (हिं.स.)। नवी मुंबई महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेचे आयोजन क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, ठाणे यांच्या सहकार्याने करण्यात आले असून या स्पर्धा फा.ॲग्नल स्पोर्टस सेंटर, सेक्टर 10, वाशी येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाल्या. विविध शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतून 14, 17 आणि 19 वर्षाआतील मुलांच्या गटात 63 संघ आणि मुलींच्या गटात 39 संघ असे एकूण 102 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. या स्पर्धेत 14 वर्षांखालील मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात दिल्ली पब्लिक स्कुल, नेरुळ शाळेचा संघ पोद्दार केम्ब्रिज स्कूल, नेरुळ यांच्यावर 3:1 अशा सेटने मात करीत पुढील मुंबई विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. या गटातील तिस-या क्रमांकासाठीच्या सामन्यात डी.ए.व्ही.पब्लिक स्कूल, ऐरोली यांनी 3:1 अशा सेटने क्राईस्ट अकॅडमी, कोपरखैरणे संघाला पराभूत केले. 17 वर्षांखालील मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात फा.ॲग्नल स्कूल, वाशी या संघाने 3:0 अशी माध्यमिक विद्यालय, विवेकानंद संकुल, सानपाडा संघावर सरळ सेटनी मात करीत पुढील मुंबई विभागीय स्पर्धेसाठी पात्रतेची बाजी मारली. तिस-या क्रमांकासाठीच्या सामन्यात 3:2 अशा सेटने जिंकत पोद्दार सी.बी.एस.ई स्कुल, नेरुळ शाळेने न्यू होरायझन पब्लिक स्कूल, ऐरोली या संघावर विजय संपादन केला. स्पर्धेतील 19 वर्षांखालील मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात फा.ॲग्नल स्कुल, वाशीहा संघ शिरवणे ज्युनिअर कॉलेज, नेरुळ यांच्या संघावर 3:1 अशा सेटने विजय मिळवत पुढील मुंबई विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला. या गटातील तिस-या क्रमांकासाठी डी.ए.व्ही. पब्लिक स्कूल,ऐरोली यांनी रिलायन्स फाउंडेशन स्कुल, कोपरखैरणे यांच्यावर 3.2 अशा सेटने विजयश्री संपादन केली. 14 वर्षांखालील मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात अमिटी इंटरनॅशनल स्कूल, सीबीडी, बेलापूर यांनी ए.पी.जे.स्कूल, नेरुळ यांच्यावर 3:0 अशा सेटने मात करीत पुढील मुंबई विभागीय स्पर्धेची पात्रता गाठली. रायन इंटरनॅशनल स्कूल, सानपाडा ही शाळा रिलायन्स फाऊंडेशन स्कूल, कोपरखैरणे यांच्यावर 3:1 अशा सेटने मात करीत तिस-या क्रमांकाची मानकरी ठरली. 17 वर्षांखालील मुलींच्या गटामध्ये फा.ॲग्नल स्कूल, वाशी यांनी व्ही.पी.एम. स्कूल, ऐरोली यांच्यावर 3:0 अशा सरळ सेटने सामना जिंकत पुढील मुंबई विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. या गटातील तिसऱ्या क्रमांकासाठीच्या सामन्यात ए.पी.जे. स्कूल, नेरुळ हे 3:2 अशा सेटने रायन इंटरनॅशनल स्कूल, सानपाडा यावर मात करीत जिंकले. 19 वर्षांखालील मुलींच्या गटातील अंतिम सामना ए.पी.जे. स्कूल,नेरुळ आणि दिल्ली पब्लिक स्कूल,नेरुळ यांच्यात झाला. त्यामध्ये 3:1 अशा सेटने दिल्ली पब्लिक स्कूल, नेरुळ शाळेचा संघ पुढील मुंबई विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला. या गटातील तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी डॉ.डी.वाय.पाटील इंटरनॅशनल स्कूल, नेरुळ ही शाळा रिलायन्स फाऊंडेशन स्कूल, कोपरखैरणे यांच्यावर 3:2 अशा सेटनी मात करीत ठरली. नवी मुंबई जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत प्रत्येक वर्षागणिक मोठया संख्येने शाळांचा सहभाग वाढत असल्याने क्रीडा विभागाच्या प्रयत्नांना यश येत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेतील प्रत्येक गटातील विजेत्या संघांना पुढील मुंबई विभागीय स्पर्धेसाठी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी शुभेच्छा प्रदान केल्या आहेत.
हिंदुस्थान समाचार / मेघा माने