ओलीसांना वाचवण्यात अपयशी ठरल्याबद्दल नेतन्याहू यांनी मागितली माफी
तेल अवीव, ३ सप्टेंबर (हिं.स.) : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासने ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांना वाचवण्यात सरकार अपयशी ठरल्याबद्दल देशवासीयांची माफी मागितली आहे. गाझामध्ये सहा ओलीसांचे मृतदेह सापडल्यानंतर इस्रायलमध्ये संतापाची
ओलीसांना वाचवण्यात अपयशी ठरल्याबद्दल नेतन्याहू यांनी मागितली माफी


तेल अवीव, ३ सप्टेंबर (हिं.स.) : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासने ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांना वाचवण्यात सरकार अपयशी ठरल्याबद्दल देशवासीयांची माफी मागितली आहे. गाझामध्ये सहा ओलीसांचे मृतदेह सापडल्यानंतर इस्रायलमध्ये संतापाची लाट उसळली. हजारो लोकांनी रस्त्यावर उतरून सरकारविरोधात तीव्र आंदोलन केले. या घटनांनंतर, इस्रायलमधील सर्वांत ताकदवान ट्रेड युनियन 'हिस्ताद्रुत'ने सर्वसाधारण संपाची हाक दिली होती. सोमवारी, २ सप्टेंबर रोजी या संपाच्या पार्श्वभूमीवर तेल अवीवमध्ये व्यवसाय, शाळा, दळणवळण, आणि विमानतळावरील सेवा ठप्प पडल्या. आंदोलकांनी पोलिसांच्या अडथळ्यांना तोंड देत रस्ते आणि हायवे ब्लॉक केले. काही ठिकाणी टायर जाळून संताप व्यक्त करण्यात आला. लेबर कोर्टाने संप मागे घेण्याचे आदेश दिल्यानंतरही आंदोलन थांबले नाही. तेल अवीवमध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. आंदोलन शांततेत सुरू झाले, परंतु लवकरच त्याने हिंसक वळण घेतले. नेतन्याहू यांच्या घराबाहेरही आंदोलकांनी निदर्शने केली. गाझामधील ओलीसांच्या नातेवाईकांनी पंतप्रधानांकडे तातडीने हमाससोबत तडजोड करून उर्वरित ओलीसांची सुटका करण्याची मागणी केली आहे. नेतन्याहू यांनीही हमासच्या ताब्यातील लोकांच्या सुटकेसाठी तडजोड करण्याची तयारी दर्शवली आहे, परंतु त्यांनी असेही स्पष्ट केले की, ज्यांनी ओलीसांची हत्या केली आहे, त्यांना कसलाही शांतता करार नको आहे. सध्या गाझामध्ये ९७ लोक बेपत्ता असून त्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. इस्रायलमधील परिस्थिती तणावपूर्ण आहे, आणि पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / Shuddhodana Mangorao


 rajesh pande