वॉशिंग्टन , 15 जानेवारी (हिं.स.)। भारतात टिकटॉकवर सरकारने बंदी घातली आहे.सुरक्षेच्या कारणामुळे भारताने या अॅपवर बंदी घालण्यात आली होती. आता अमेरिकेकडून देखील या अॅपवर सुरक्षेच्या कारणास्तव बंदी घातली जाऊ शकते.अमेरिकेत टिकटॉकच्या बंदीसंबंधी निर्णय सर्वोच्च न्यायालय करणार आहे.येथील अनेक राज्यांनी याआधीच स्थानिक स्तरावर अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
टिकटॉकची मालकी ही मूळ कंपनी बाईटडान्स लिमिटेडकडे ठेवण्याचे प्रयत्न चीनी सरकारकडून करण्यात येत आहेत. त्यामुळेच चीन टिकटॉकच्या भविष्यासाठी काही पर्यायी रणनितींचा विचार करत आहे. रिपोर्टनुसार, ट्रम्प प्रशासनासोबत काम करण्याच्या योजनांवर चिनी अधिकाऱ्यांची चर्चा सुरू आहे. यापैकी एलोन मस्क यांना टिकटॉकच्या अमेरिकेतील संचालनाचे अधिग्रहण करण्याचा पर्याय उपलब्ध करुन देणे हि एक महत्त्वपूर्ण योजना आहे.दरम्यान, या संभाव्य कराराबद्दल मस्क, टिकटॉक आणि बाईटडान्स यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली हे स्पष्ट झालेले नाही. अमेरिकेच्या संसदेने मंजूर केलेल्या कायद्यानुसार टिकटॉकची मूळ कंपनी असलेल्या बाइटडान्ससमोर दोन पर्याय आहेत. एक म्हणजे कंपनीने टिकटॉकची विक्री करावी किंवा 19 जानेवारी 2025 पासून अमेरिकेत टिकटॉक पूर्णपणे बंद करावे. अमेरिकेतील खासदारांकडून टिकटॉकला अतिरिक्त 90 दिवसांची मूदत देण्याची देखील मागणी केली जात आहे. त्यामुळे बायडन प्रशासन टिकटॉकला अतिरिक्त मुदत वाढ देणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. हे चाइनीज अॅप अमेरिकन नागरिकांची खासगी माहिती चोरत असून, यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे म्हटले जात आहे.
एकीकडे अमेरिकेत टिकटॉकवर बंदी येणार अशी चर्चा सुरू असतानाच अब्जाधीश इलॉन मस्क ट्विटरपाठोपाठ या अॅपला देखील खरेदी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून देखील अॅपच्या हस्तांतरण प्रक्रियेविषयी विचार केला जात असल्याचे सांगितले जाते.कंपनीकडून टिकटॉक अमेरिकेत सुरू राहावे, यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा विचार केला जात आहे. तसेच, इलॉन मस्क यांनी टिकटॉक खरेदी करणार की नाही, याविषयी अधिकृतरित्या कोणतेही भाष्य केलेले नाही. केवळ, अमेरिकेत टिकटॉकवर बंदी घालण्यात येऊ नये, अशी भूमिका त्यांनी काही महिन्यांपूर्वी मांडली होती. त्यामुळे आता मस्क टिकटॉक खरेदी करणार की अमेरिकेत या अॅपवर बंदी येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode