भारताने बांगलादेशच्या उप उच्चायुक्तांना बजावले समन्स 
नवी दिल्ली, 13 जानेवारी (हिं.स.)। मागील काही दिवसांपासून भारत आणि बांगलादेशच्या सीमेवर तणावाची स्थिती आहे. बांगलादेशने केलेल्या कारवाईनंतर आता भारत सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. बांगलादेशने सीमेवरील कुंपणाच्या वादाबाबत भारतातील उच्चायुक्तांना बोलाव
भारत बांगलादेश


नवी दिल्ली, 13 जानेवारी (हिं.स.)। मागील काही दिवसांपासून भारत आणि बांगलादेशच्या सीमेवर तणावाची स्थिती आहे. बांगलादेशने केलेल्या कारवाईनंतर आता भारत सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. बांगलादेशने सीमेवरील कुंपणाच्या वादाबाबत भारतातील उच्चायुक्तांना बोलावले होते. त्यांनतर आता परराष्ट्र मंत्रालयाने बांगलादेशचे उपउच्चायुक्त नुरुल इस्लाम यांना समन्स पाठवले आहे.

भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने बांगलादेशचे उप उच्चायुक्त नूरल इस्लाम यांना समन्स बजावले होते. ते सोमवारी दिल्लीतील परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयातून बाहेर पडताना दिसले. बांगलादेशने भारताच्या उच्चायुक्तांना समन्स बजावल्यानंतर हा घटनाक्रम घडला आहे. बांगलादेशच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना समन्स बजावले होते. बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना बोलावून बीएसएफने केलेले कुंपण बेकायदेशीर असल्याचे घोषित केले होते. बांगलादेशने म्हटले आहे की, भारत सीमेवर पाच ठिकाणी सुरक्षा कुंपण करण्याचे प्रयत्न करत आहे. हे दोन्ही देशात झालेल्या कराराचे उल्लंघन आहे. बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयातील भेटीनंतर भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांनी सांगितले की, या बैठकीत स्मगलिंग, गुन्हेगारी कृत्ये आणि तस्करीच्या मुद्द्यावर चर्चा झाली. गुन्हेगारी मुक्त सीमा रेषा करण्याच्या दिशेने चर्चा झाली, अशी माहिती वर्मा यांनी दिली.

भारत-बांगलादेश सीमेवरील चपैनवाबगंज (उत्तर पश्चिम), नौगाव, लालमोनिऱ्हाट आणि तीन बिघा कॉरिडोर येथे बीएसएफच्या कामावर बांगलादेशने आक्षेप घेतला आहे. बांगलादेश गृह मंत्रालयाचे बैठक झाली होती. या बैठकीनंतर बांगलादेशच्या गृह मंत्रालयाचे सल्लागार सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल एमडी जहांगीर आलम चौधरी यांनी 'बांगलादेश आपल्या सीमेवर कोणालाही जागा देणार नाही', असे म्हटले होते. भारत-बांगलादेश सीमेवर शून्य रेषेच्या १५० फूटाच्या आत कोणतेही लष्करी बांधकाम करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे चौधरी यांनी म्हटले आहे. बांगलादेशच्या विरोधामुळे भारताला तीन जिल्ह्यातील पाच ठिकाणी सीमेवर काम थांबवावं लागलं आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande