सोलापूर, 15 जानेवारी (हिं.स.)।
रस्ते अपघात रोखण्यासाठी सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अर्जुनसोंड व अनगर पाटी या दोन ठिकाणी उड्डाणपूल व सर्व्हिस रोड तयार केला जात आहे. दुसरीकडे सावळेश्वर पाटीजवळ देखील उड्डाणपूल प्रस्तावित असून त्यासाठी मंजुरी मिळाल्यानंतर याचेही काम काही दिवसांत सुरू होणार आहे. सध्या अर्जुनसोंड व अनगरजवळील उड्डाणपूलासाठी ६४ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. एका वर्षात उड्डाणपुलांचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
सोलापूर जिल्ह्यात दररोज सरासरी दोन जणांचा अपघाती मृत्यू होतोय. दरवर्षी रस्ते अपघाताबरोबरच अपघाती मृत्यूचे प्रमाणही वाढतच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सर्वाधिक अपघात होणाऱ्या ठिकाणी विशेषतः ज्या गावकऱ्यांना शेती किंवा घराकडे ये-जा करण्यासाठी विरुद्ध दिशेने प्रवास करावा लागतो अशा ठिकाणी नव्याने उड्डाणपूल तयार केले जात आहेत. मोहोळ शहरातील इंदिरा कन्या प्रशालेजवळ सतत अपघात होत होते. त्याठिकाणी आता उड्डाणपूल तयार करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड