अहिल्यानगर दि. 15 जानेवारी (हिं.स.) :- शेवगाव तालुक्यातील आखेगाव रोड येथे राहाणार्या विवाहितेचा छळ करून तिचा खून केल प्रकरणी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अंजु एस.शेंडे यांनी ५ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.सदरची खुनाची घटना १९ जानेवारी २०२० रोजी शेवगावमध्ये घडली होती.
आरोपी क.१ नामे मुजक्कीर रियाजुद्दीन शेख, वय ३३ आरोपी कर फरजाना उर्फ सायराबानु रियाजुद्दीन शेख वय ५४, आरोपी क. ३ रियाजुद्दीन हाशमुद्दीन शेख, आरोपी क. ४ असीम रियाजुद्दीन शेख वय ३१, आरोपी क. ५ अलमास उर्फ सुमय्या रियाजुद्दीन शेख वय २७ आरोपी क. १ ते ५ सर्व राहणार आखेगाव रोड शेवगाव ता. शेवगाव, जि. अहमदनगर यांना भा.द.वि. ४९८ अ सह ३४ व भा.द.वि ३०२ सह ३४ प्रमाणे दोषी धरून प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अंजु एस. शेंडे मॅडम यांनी ४९८ अ सह ३४ प्रमाणे ३ वर्ष सक्त मजुरी व प्रत्येकी रक्कम रूपये १०००/- व दंड न भरल्यास १० दिवस साध्या कैदेची शिक्षा, तसेच भा.द.वि.का. कलम ३०२ सह ३४ प्रमाणे जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी रु.५००० रू दंड व दंड न भरल्यास १ महिना साध्या कैदेची शिक्षा वरील सर्व आरोपींना ठोठावली आहे.सदर खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अर्जुन पवार यांनी काम पाहिले.सदर घटनेची थोडक्यात हकिकत अशी कि,फिर्यादी गियासुदीन जमालुद्दिन शेख वय ५० वर्षे यांनी दि. २०/०२/२०२० रोजी शेवगाव पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली होती की, त्यांची मुलगी अफरीन हिचे लग्न २८/०१/२०१६ रोजी आरोपी क. १ याचे सोबत पैठण येथे झालेले होते. त्यांचे लग्नानंतर त्यांची मुलगी पती आरोपी क. १, सासू आरोपी क. २, सासरे आरोपी क. ३, दिर आरोपी क ४ व नणंद आरोपी क. ५ यांच्याकडे आखेगाव रोड, शेवगाव येथे नांदण्यासाठी गेली. आरोपी क. १ हा फिर्यादी यांचा जावई व आरोपी क. २ हि फिर्यादी यांची बहिण आहे. फिर्यादी यांचे मुलीला वरील आरोपी यांनी ६ महिने चांगले नांदविले. त्यानंतर वरील सर्व आरोपींनी आरोपी क १ यांस मोबाईल दुकान टाकण्यासाठी माहेरून रू५०,०००/- घेवून येण्यास अफरीन हिला सांगितले. पैसे दिले नाहीतर मला त्रास देतील असे मयत ही फिर्यादी यांना सागत असे त्यामुळे फिर्यादी यांनी मुलीला त्रास होवू नये म्हणून आरोपी क. ३ यांच्याकडे रू. ५०,०००/- दिले.त्यानंतर वरील आरोपींनी तीन ते चार महिने मयत हिस चांगले नांदविले.त्यानंतर वरील आरोपी हे मयत हिस पुन्हा त्रास देवू लागले व मयत हिस माहेरी आणून सोडले.त्यांनतर आरोपी क. २ हि फिर्यादी यांचे पत्नीस म्हणली की, लोंकाकडून उसने घेतलेले पैसे परत देण्यासाठी रु.८०,०००/- दया मग आम्ही अफरीन हिला नांदावयाला घेवून जातो नाहीतर आम्ही तिला नादावयाला घेवून जाणार नाही.त्या नंतर फिर्यादीचे पत्नीने मुलीला त्रास नको म्हणून रू. ८०,०००/- आरोपींना दिले त्यानंतर वरील पाचही आरोपींनी अफरीन हिला तीन ते चार महिने चांगले नांदविले.व त्यानंतर पुन्हा त्रास देण्यास सुरूवात केली.फिर्यादींनी पुढे असे सांगितले की,अफरीन हि भेटावयास आली तेव्हा तिने सागितले की, मला वरील सर्व आरोपी मारहान करतात.माहेरून पैसे आणण्यासाठी त्रास देतात.शारिरीक छळ करतात.मानसिक त्रास देतात घरात कोडून ठेवतात,मला जेवायला देत नाहीत.अशा प्रकारे वरील आरोपी हे मयतास त्रास देत होते.नंतर १९/०१/२०२० रोजी फिर्यादी यांना फोन आला की,त्यांचे मुलीला सरकारी दवाखाना शेवगाव येथे अॅडमिट केलेले आहे. तेव्हा ते मुलीला भेटण्यासाठी दवाखान्यात गेले असता, त्यांची मुलगी मयत झाली होती. तिच्या अंगावर जखमा दिसत होत्या.त्या नंतर शेवगाव पोलीस स्टेशन यांनी अफरीन हिचे मृत्यूबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करून गुन्हयाचा तपास चालू केलेला होता.त्यानंतर फिर्यादी यांनी वरील सर्व आरोपीविरूद्ध सविस्तर फिर्याद दाखल केल्याने त्याबाबत गुन्हा रजिस्टर करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हयाचा संपूर्ण तपास पी.एस.आय.सोपान गोरे यांनी केला व न्याया लयात दोषारोपपत्र दाखल केले.मयत अफरीन हिचे शवविच्छेदन करण्यात आले होते.त्यानुसार मृत्यूपुर्वी तिचे अंगावर चोविस जखमा दिसून आलेल्या होत्या.तसेच आरोपी क. २ हिने मयतास मारण्यासाठी वापरलेली बांबूची काठी हि पंचनाम्यादरम्यान काढून दिलेली होती.आरोपीनी पैशांच्या मागणीसाठी मयत अफरीन हिचा शारिरीक व मानसिक छळ करून तिचा खून केला आहे ही बाब न्यायालयात सिद्ध झालेली असल्याने आरोपीना शिक्षा ठोठावण्यात आली.वरील केसमध्ये सरकारी पक्षातर्फे एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये फिर्यादी तसेच शवविच्छेदन करणारे वैदयकिय अधिकारी डॉ. प्रसाद सायगांवकर यांच्या साक्षी महत्वपूर्ण मानण्यात आल्या. तसेच आरोपी यांचे वतीने एकूण ०५ साक्षीदार तपासण्यात आले.न्यायालयासमोर आलेला तोंडी पुरावा व कागदोपत्री पुरावा ग्राहय धरून न्यायालयाने आरोपी यांना दोषी धरून वरील प्रमाणे शिक्षा दिली. वरील केसमध्ये सरकारी पक्षाचे वतीने अति. सरकारी अभियोक्ता अर्जुन बाळासाहेब पवार यांनी काम पाहीले.त्यांना जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांनी मार्गदर्शन केले.तसेच न्यायालयामध्ये साक्षीपुरावा नोंदवित असताना पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक एम.ए. जोशी व शेवगांव पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक एन.बेळगे यांनी सरकारी वकील यांना सहाय्य केले.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni