सोलापूर, 17 जानेवारी (हिं.स.)।रिक्षातून दररोज शाळेला जाणाऱ्या मुलीची चालकासोबत चांगली ओळख झाली. त्याने विश्वास संपादित करून मैत्रीचा हात पुढे केला. पुढे ते एकमेकांसोबत बोलू लागले. पण, एकेदिवशी त्या तरुणाने अल्पवयीन मुलीसोबत जबरदस्तीने बलात्कार केला. त्यानंतर काही दिवसांतच ११ जणांनी आळीपाळीने सतत अत्याचार केले. अल्पवयीन पीडितेच्या आर्थिक व कौटुंबिक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन तिच्या अत्याचार करणाऱ्या नराधमांना शिक्षा होण्यासाठी जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांनीही कोर्टात अचूक युक्तिवाद केला. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. केंद्रे यांनी गुन्ह्यातील आठ आरोपींना जन्मठेप तर, तिघांना २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
ऑगस्ट २०१९ मध्ये रिक्षातून शाळेत जाणाऱ्या पीडितेची ओळख चालक सचिन श्रीकांत राठोड याच्यासोबत झाली. काही दिवसांतच ओळखीतून मैत्री आणि पुढे प्रेमात रूपांतर झाले. मुलीचा विश्वास बसल्याची खात्री करून सचिनने लग्नाचे आमिष दाखवून लॉजवर नेऊन जबरदस्तीने अत्याचार केले. तिला रंगभवन चौकात सोडले, त्यावेळी राज ऊर्फ राजकुमार सिद्राम देसाई याने तिला रिक्षात बसवून नेऊन अत्याचार केला. त्याच दिवशी सायंकाळी प्रवीण श्रीकांत राठोड यानेही शहराबाहेर नेऊन अत्याचार केले. काही दिवसांनी प्रवीणचा मित्र आनंद ऊर्फ राजवीर राठोड यानेही अत्याचार केले. त्यानंतर गणेश ऊर्फ अक्षय विष्णू चव्हाण व सतीश अशोक जाधव या दोघांनी पीडितेला रिक्षातून शहराजवळील जंगलात नेऊन आळीपाळीने अत्याचार केले.
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड