सोलापूर, 17 जानेवारी (हिं.स.)।
बार्शीतील पंकज नगर भागात बेकायदेशीररित्या बनावट आधार कार्ड तयार करून घेऊन राहणार्या सहा बांगला देशी नागरिकांवर गुन्हा दाखल केला आहे. सोलापूर येथील दहशतवाद विरोधी पथक, एटीबीचे पथक व बार्शी पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. त्यांच्याकडून एक लाख 41 हजार 600 रुपये व 46 हजारांचे मोबाईल जप्त केले.नजमा याशिन शेख ऊर्फ बिठी बेगम यासीन शेख (33), रेहना बेगम समद शिकदर ऊर्फ साथी रूबेल खान (33), आरजिना खातून अन्वर शेख (16), शिखा शाकीब बुहीया (22), शाकीब बादशाह दुहीया (23), शोएब ऊर्फ शोएब सलाम शेख (24, सर्व रा. बांगला देश, सध्या रा. पंकजनगर, बार्शी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.विशाल मांगडे, राणी (पूर्ण नाव माहित नाही) व किरण परांजपे यांनी त्यांना मदत केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. बांगला देश येथील आरोपींनी भारतीय बनावट आधार कार्ड बनवून ते सोबत बाळगून त्यांनी गुन्हा केला आहे. पोलिस उपनिरीक्षक सोनम जगताप यांनी फिर्याद दिली आहे. ही कारवाई दहशतवाद विरोधी पथक सोलापूर युनिटचे पोलिस निरीक्षक सिद्धार्थ कदम व पथक तसेच एटीबीचे पोलिस निरीक्षक डी. एस. बोरीगिड्ढे, पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली. शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास उमाकांत कुंजीर करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड