गडचिरोली., 2 जानेवारी (हिं.स.)। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात येत असलेल्या विविध प्रयत्नांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. नववर्षाच्या प्रारंभी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेला गडचिरोली दौरा हा येथील नागरिकांच्या आयुष्यात सुख-समाधान आणण्यासह सकारात्मक बदल घडवून आणेल, असा विश्वास प्रधानमंत्री मोदी यांनी ‘ट्वीचरवर (एक्स) व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन वर्षाच्या प्रारंभी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विविध विकासकामांची सुरूवात करतानाच सामाजिक सलोखा आणि शांतता अबाधित रहावी यासाठी आपला संकल्प जाहीर केला. गडचिरोली यापुढे महाराष्ट्रातील शेवटचा जिल्हा राहणार नसून तो पहिला जिल्हा ठरण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच, याठिकाणी सुरू असलेल्या औद्योगिकीकरणामुळे इथल्या नागरिकांना अत्याधुनिक पायाभूत सुविधा मिळतील, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली. गडचिरोलीच्या विकासासाठी राज्य शासनाने घेतलेला पुढाकार आणि त्यास मिळत असलेल्या नागरिकांच्या प्रतिसादाबद्दल प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी गडचिरोली आणि परिसरातील नागरिकांचे विशेष अभिनंदन केले आहे. महाराष्ट्र शासन राबवित असलेले विविध उपक्रम, योजना, अभियान यामुळे राज्याच्या प्रगतीचा मार्ग आणखी प्रशस्त होईल, असा विश्वास प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या ‘एक्स’ या समाजमाध्यमावर व्यक्त केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond