हैदराबाद-ह. निजामुद्दीन दक्षिण एक्स्प्रेसमधील घटना
चारही मारेकऱ्यांना नागपूर स्थानकावर अटक
नागपूर, 02 जानेवारी (हिं.स.) : धावत्या रेल्वेत चोरांनी घेतलेले पैसे परत मागणे एका प्रवाशाला चांगलेच महागात पडले. चोरट्यांनी केलेल्या बेदम मारहाणीत या प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना दक्षिण एक्स्प्रेसच्या जनरल बोगीत घडली. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी नागपुरात गुन्हा दाखल करून चारही आरोपींना ताब्यात घेतले आहे. शशांक राज रामसिंग (रा. राजापूर, उत्तरप्रदेश) असे मृतकाचे नाव आहे. तर मोहम्मद फैय्याज, सय्यद समीर, एम. श्याम कोटेश्वर राव आणि मोहम्मद अमान अकबर अशी आरोपींची नावे आहेत.
यासंदर्भात मृतक प्रवाशाचा मित्र आणि डब्यातील इतर प्रवाशांकडून मिळालेल्या माहितीनुसार
मृतक शशांक आणि त्याचा मित्र कपील हे दोघेही धान कापण्यासाठी सिकंदराबादच्या पुढे ग्रामीण भागात गेले होते. धान कापणी पूर्ण झाल्यानंतर कामाचे पैसे घेवून दोघेही दक्षिण एक्स्प्रेसने (गाडी क्र. 12721) नागपूरसाठी निघाले होते. इंजिनपासून पहिल्याच जनरल कोचमधून प्रवास करीत होते. नागपूरातून हे दोघे आपल्या मुळ गावी जाणार होते. त्याच डब्यात आरोपीसुध्दा होते. चारही आरोपींचा गुन्हे इतिहास आहे. शशांक आणि त्याचा मित्र झोपेत असताना आरोपींनी शशांकच्या खिशातील 1700 रुपये आणि कपीलच्या खिशातील मोबाईल चोरला. शशांकला जागी आली त्याने आरोपींना रंगेहात पकडले. शशांक आरोपींना पैसे परत करण्याची विनवनी केली. मात्र, आरोपी पैसे न देता त्याच्यावर तुटून पडले. या मारहाणीत त्याला रक्ताची उलटी देखील झाली. धावत्या रेल्वेत पहाटे 3.30 वाजता ही घटना घडली तेव्हा तेलंगणातील एक पोलिस शिपाई त्या बोगीत होता. परंतु, काहीही कारवाई न करता तो निघून गेला. प्राणांतिक मारहाण झाल्यानंतर शशांक तब्बल 3 तास तसाच पडून होता. सकाळी 6 वाजेच्या सुमारास त्याचा श्वासोश्वास थांबला. त्यानंतर सहप्रवाशांनी हिंमत दाखवून चारही आरोपींना पकडून ठेवले. गाडी महाराष्ट्राच्या सीमेत दाखल होताच बल्लारशा रेल्वा स्थानकावर आरपीएफ जवान डब्यात आले. त्यांनी लोहमार्ग नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती दिली. त्यानुसार गाडी नागपूर रेल्वे स्थानकावर पोहचताच लोहमार्ग पोलिस निरीक्षक गौरव गावंडे यांच्या पथकाने सर्व चारही आरोपींना ताब्यात घेतले. हे प्रकरण तेलंगणातील लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करून आरोपींना त्यांच्याकडे सोपवले जाणार असल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले.
----------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी